लोक आता भ्रष्टाचार सहन करणार नाहीत: मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मी या निकालांबद्दल जनतेचे आभार मानतो. लोकांना सर्वांगीण विकासाची इच्छा असून भ्रष्टाचार व गैर कारभार सहन केला जाणार नाहे, हेच या निकालांमधून दिसून आले आहे

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विविध स्तरांवरील निवडणुकांमधील चमकदार कामगिरीसंदर्भात आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) देशातील जनतेस सर्वांगीण विकास हवा आहे; आणि आता भ्रष्टाचार व गैर कारभार सहन केला जाणार नसल्याचेच या निकालांमधून दिसून आल्याचे मत व्यक्त केले आहे.

"गेल्या काही दिवसांत लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्था अशा विविध स्तरांवरील निवडणुकांचे निकाल आपणांस पहावयास मिळाले आहेत. ईशान्य भारत, पश्‍चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केली आहे. मी या निकालांबद्दल जनतेचे आभार मानतो. लोकांना सर्वांगीण विकासाची इच्छा असून भ्रष्टाचार व गैर कारभार सहन केला जाणार नाहे, हेच या निकालांमधून दिसून आले आहे,'' असे मोदी यांनी म्हटले आहे.

आसाम राज्यामधील एका लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने विजय मिळविला आहे; तर मध्य प्रदेश, गुजरात आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांतही पक्षास यश मिळाले आहे. याशिवाय, गुजरात व महाराष्ट्रामधील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांतही भाजपने आश्‍वासक कामगिरी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करत वरील भावना व्यक्त केली आहे.

Web Title: people won't tolerate corruption now, says PM