‘यूपी’त मिरवणुकांसाठी परवानगी अनिवार्य, योगींचे निर्देश

योगी आदित्यनाथ यांचे निर्देश लाउडस्पीकरच्या आवाजावरही मर्यादा
CM Yogi Adityanath
CM Yogi Adityanathsakal

लखनौ : धार्मिक सणासुदीच्या काळामध्ये विविध राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावरून वातावरण तापले असताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणतीही परवानगी न घेता धार्मिक मिरवणुका काढण्यास मनाई केली असून लाउड स्पीकरच्या वापरामुळे इतरांना त्रास होता कामा नये असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यामध्ये पुढील महिन्यात ईद आणि अक्षय तृतीयेनिमित्त विविध ठिकाणांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अन्य धर्मीयांचेही उत्सव होऊ घातले आहेत त्यामुळे पोलिस खात्याने अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. प्रत्येकजणाला त्याच्या धर्माच्या चौकटीमध्ये पूजाविधी आणि धार्मिक उत्सव साजरे करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येक धर्मीयांना लाउडस्पीकरचा वापर करता येईल पण याचा आवाज संबंधित प्रार्थनास्थळाच्या बाहेर येता कामा नये अन्य लोकांनाही याचा त्रास होता कामा नये. परवानगीशिवाय कोणालाही धार्मिक मिरवणुका काढता येणार नाहीत. आयोजकांना देखील अशा प्रकारच्या मिरवणुकांचे आयोजन करण्यापूर्वी शांतता आणि सौहार्द कायम राहील याची हमी द्यावी लागेल. ज्यांना काही वर्षांची परंपरा आहे अशाच मिरवणुकांना परवानगी दिली जाईल. नव्या अनावश्यक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, असेही आदित्यनाथ म्हणाले.

वाहतूक विस्कळित होऊ नये

जहाँगीरपुरीत हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारने खबरदारी बाळगायला सुरूवात केली आहे. त्याहीआधी रामनवमीच्या दिवशी मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्यामुळेच पूर्वनिर्धारित ठिकाणीच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळित होता कामा नये असेही ताज्या निर्देशांत नमूद करण्यात आले.

पोलिस, अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द

या सणासुदीच्या काळामध्ये ४ मेपर्यंत सर्व पोलिस आणि बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून जे सध्या रजेवर आहेत त्यांना चोवीस तासांच्या आत कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी येत्या चोवीस तासांमध्ये धार्मिक नेत्यांशी संवाद साधा अशा प्रकारचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संवेदनशील भागामध्ये अतिरिक्त पोलिस फाटा तैनात करण्यात येईल. दररोज रात्री पोलिसांनी पायी गस्त घालणे अपेक्षित आहे असेही आदेशांत म्हटले आहे.

राज्यातील वातावरण कलुषित करू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशाप्रकारच्या वृत्तींना समाजामध्ये कोणताही थारा देता कामा नये.

- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तरप्रदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com