पेट्रोलचा दर वर्षातील नीचांकी पातळीवर

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

तेल वितरक कंपन्यांकडून आणखी 30 पैशांची कपात 

नवी दिल्ली- जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत खनिज तेल दरात झालेल्या घसरणीमुळे देशात पेट्रोलचा दर चालू वर्षातील नीचांकी पातळीवर आला आहे. तेल वितरक कंपन्यांनी शनिवारी (ता.29) पेट्रोल व डिझेल दरात अनुक्रमे 30 आणि 32 पैशांची कपात केली.

चालू आठवड्यात खनिज तेलाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत 1.5 टक्‍क्‍यांची घसरले. परिणामी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी इंधनदरात कपात केली. यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 69.26 रुपये प्रतिलिटर या वर्षभरातील नीचांकी पातळीवर आला. तत्पूर्वी गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात तो 84 रुपयांवर गेला होता. मुंबईतही पेट्रोलचा दर 75 रुपयांखाली (74.89 रुपये) आला असून, कोलकाता व चेन्नई या शहरांतील त्याची अनुक्रमे 71.37 व 71.85 रुपये दराने विक्री सुरू आहे.

दरम्यान, डिझेल दरात झालेल्या कपातीनंतर दिल्लीत त्याचा दर 63.32 रुपये असून, कोलकाता, मुंबई व चेन्नई या शहरातील ग्राहकांना एक लिटर डिझेलसाठी अनुक्रमे 65.07, 66.25 व 66.84 रुपये मोजावे लागत आहेत. 
 

Web Title: Petrol prices at the lowest level of the year