
औषध निर्यातीला १.५ अब्ज डॉलरचा दणका, लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळीत अडचणी
* औषध निर्माण क्षेत्रातील निर्यातीतील वाढ फेब्रुवारीत ७.७ टक्केआणि मार्चमध्ये उणे २३.२४ टक्के
* भारताने केली २०.५८ अब्ज डॉलरची निर्यात, अपेक्षित होती २२ अब्ज डॉलरची निर्यात
* औषधांच्या घटकद्रव्यांच्या निर्यातीत घट
* महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारच्या दोन योजना
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारताची औषध निर्माण क्षेत्राशी निगडित निर्यातीला २०१९-२० या आर्थिक वर्षात १.५ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत औषध निर्माण क्षेत्राने उणे वाढ नोंदवल्यामुळे औषध निर्माण क्षेत्राने २०.५८ अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. प्रत्यक्षात २२ अब्ज डॉलरची निर्यात या क्षेत्राकडून अपेक्षित होती. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी औषध निर्माण क्षेत्राने ७.५७ टक्के निर्यात वाढ नोंदवली आहे. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १०.७२ टक्के वाढ या क्षेत्राने नोंदवली होती.
फार्मास्युटीकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार औषधनिर्माण क्षेत्राने सरलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निर्यातीत ११.२१ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. दुसऱ्या तिमाहीत आणि तिसऱ्या तिमाहीत ही वाढ अनुक्रमे ८.६९ टक्के आणि १४.६४ टक्के इतकी होती. जानेवारी महिन्यातसुद्धा निर्यातीत ११.७२ टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र कोविड-१९ महामारूमुळे जगभर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे संबंधित पुरवठा साखळीतील अडथळे, निर्यातीवरील बंदी आणि महत्त्वाच्या बाजारपेठा बंद यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निर्यातीतील वाढ अनुक्रमे ७.७ टक्के आणि उणे २३.२४ टक्क्यांवर आली आहे. यामुळे सरलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत या क्षेत्राने उणे २.९७ टक्के वाढ नोंदवली आहे.
'भारत 'एपीआय'साठी म्हणजेच औषध निर्मितीतील सर्वात महत्त्वाच्या घटकासाठी ६० ते ७० टक्के चीनवर अवलंबून आहे. कोविड-१९ मुळे पुरवठा साखळीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आपली 'एपीआय'ची आयात मोठ्या प्रमाणात खाली आली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्यामुळे आणि काही उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी असल्यामुळे औषधांच्या निर्यातीत घट झाली आहे', असे मत फार्मास्युटीकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे महासंचालक उदया भास्कर यांनी व्यक्त केले आहे.
सर्वसाधारणपणे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारतीय औषधांची निर्यात तेजीत असते. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या तिमाहींमध्ये निर्यातीत झालेली वाढ आणि अमेरिकेतील औषधांच्या किंमतींमध्ये आलेली स्थिरता यामुळे या आर्थिक वर्षात भारताची औषधांची निर्यात २२ अब्ज डॉलरवर पोचण्याचा अंदाज होता, असेही पुढे भास्कर यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने फार्मास्युटीकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार काही योजना सुरू केल्या आहेत. भारताची एपीआय आणि इतर महत्त्वाच्या कच्च्या मालासंदर्भातील आयातीवरील अवलंबितता कमी करण्यासाठी या योजना आखण्यता आल्या आहेत. यासाठी केंद्र सरकार तीन मोठे बल्क ड्रग पार्क उभारणार आहे. त्यासाठी सरकारकडून अनुदानसुद्धा दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक पार्कला प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती भास्कर यांनी दिली आहे. तर दुसऱ्या योजनेनुसार ५३ पात्र औषध उत्पादकांना (एपीआय उत्पादक) सहा वर्षांसाठी विशेष आर्थिक लाभ दिला जाणार असून त्यासाठी ६,९४० कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.