जीएसटीत एकच टप्पा मूर्खपणाचा - पीयूष गोयल

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जुलै 2018

गेल्या वर्षी जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर 1,200 पैकी 328 वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले. सर्वच करदात्यांनी कर भरल्यास आणखी वस्तूंवरील कर अथवा कराचे टप्पे कमी करता येतील. - पीयूष गोयल, केंद्रीय अर्थमंत्री

कोलकाता : काही राजकीय पक्षांनी वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) कराचा केवळ एकच टप्पा असावा, अशी मागणी केली असून, ती मूर्खपणाची आहे, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी केली.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात बोलताना गोयल म्हणाले, ""काही राजकीय पक्षांनी जीएसटीतील कराचे चार टप्पे रद्द करण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेसने तर 2019 मध्ये सत्तेत आल्यास जीएसटीतल कराचे चार टप्पे रद्द करून कराचा केवळ एकच टप्पा करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. कराच एकच दर ठेवण्याची शिफारस मूर्खपणाची आहे. मीठ, साखर आणि कपडे यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर 18 टक्के कर आकारल्यास गरीब आणि मध्यमवर्गावर मोठा बोजा पडेल.'' 

आधीच्या कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जीएसटीचा एकच 18 टक्के दर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा दर स्वीकारण्यात आला नाही. तो स्वीकारला असता तर जीएसटी रचना यशस्वी ठरली नसती. मर्सिडीज बेंझ आणि विमाने एकच दर ठेवल्यास स्वस्त झाली असती. हा प्रशासनाचा अतिशय वाईट नमुना ठरला असता, असे गोयल यांनी नमूद केले.

Web Title: Piyush Goyal says only one step in GST is wrong