पॅरिसमध्ये शिक्षकाच्या शिरच्छेद प्रकरणी नऊ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रोन यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

पॅरिस : फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याप्रकरणी नऊ लोकांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या एका 18 वर्षीय युवकाकडून करण्यात आली होती, ज्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्याला गोळी मारली होती. आपल्या वर्गात विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी माहिती देताना या शिक्षकांने महम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवले होते, म्हणून ही हत्या करण्यात आली आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रोन यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

काय आहे प्रकरण?
पोलिसांनी म्हटलंय की, मृत 47 वर्षीय शिक्षक इतिहास विषय शिकवत असत. सॅम्यूअल पॅटी असं या शिक्षकांचे नाव होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेवेळी वर्गात त्यांनी विद्यार्थ्यांना महम्मद पैगंबर यांची काही व्यंगचित्रे दाखवली. यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या शिक्षकाची तक्रारही केली होती. यानंतर 16 ऑक्टोबर रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये त्या शिक्षकावर हल्लेखोराने चाकूने हल्ला करुन शिरच्छेद केल्याची घटना समोर आली. हा दहशतवादी हल्ला असल्याचा निर्वाळा देत फ्रान्स सरकार याबाबत अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर पॅरिस बिहेडींग नावाचा हॅशटॅग ट्रेडिंग आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला शरण यायला सांगितलं होतं मात्र त्याने न ऐकल्याने पोलिसांनी त्याला सरतेशेवटी गोळी झाडून मारलं. 

हेही वाचा - US Election "निवडणुकीत पराभव झाल्यास मला देश सोडावा लागेल"

काय आहे पार्श्वभूमी?
मागच्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये साप्ताहिक शार्ली हेब्दोने मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र पुन्हा एकदा प्रकाशित केले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून आमची व्यंगचित्र योग्य असल्याचा दावा शार्ली हेब्दोच्या संपादकांनी केला होता. सत्तेत असणाऱ्यांविरोधातील व्यंगचित्र छापण्याचं काम शार्ली हेब्दो करतं. जहाल उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन, ज्यू तसंच इस्लामिक श्रद्धांसंदर्भात शार्ली हेब्दो नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे. 

शार्ली हेब्दोचे ट्विट
या शिक्षकावरील हल्ल्यानंतर शार्ली हेब्दोनं ट्वीट करून म्हटलंय की, "असहिष्णुतेच्या नव्या टोकावर आपण पोहोचलो आहोत आणि असं वाटतंय की, आपल्या देशात दहशतवाद पसरण्याला रोखण्यास आपण असमर्थ ठरतोय." हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला सरतेशेवटी गोळी झाडून मारलं. 

हेही वाचा - New Zealand:जॅसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीचा निवडणुकीत मोठा विजय

2015 मधील 'शार्ली हेब्दो'वरील हल्ला...
फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेला पार्श्वभूमी आहे ती 2015 साली शार्ली हेब्दोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची... महम्मद पैगंबरांचे एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं म्हणून शार्ली हेब्दोवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाला होता. यात अनेक प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शिक्षक हे इतिहास आणि भूगोल हे दोन विषय शिकवत असत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर वर्गात चर्चा करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना शार्ली हेब्दोमध्ये प्रकाशित झालेलं मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र दाखवलं होतं. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paris beheading france arrested 9 people declared a terrorist attack