
नवी दिल्ली - कोरोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन नंतर पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. कोरोनाची खबरदारी म्हणून मागील दोन ते तीन महिन्यांपासून देशात लॉकडाउन करण्यात आले होते. या लॉकडाउनमध्ये सामान्य जनतेला दररोज लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पुरवण्याचे कठीण काम चालूच राहिल्याने, परिस्थिती काही प्रमाणात का होईना सामान्य राहण्यास मदत झाली. परंतु, आता अर्थव्यवस्थेची बिघडलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी लॉकडाउनच्या नियमात बदल करत, शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आवश्यक गोष्टींपासून सर्वच वस्तूंचा पुरवठा रेड झोनसहित सगळीकडेच पोहचविण्याची मुभा देण्यात आली आहे. या आवश्यक गोष्टी पोहोच करणारे डिलेव्हरी बॉय देखील अत्यावश्यक सेवेत मोडतात. देशात जवळ-जवळ १.८ लाख डिलेव्हरी बॉय आपले जीवन धोक्यात घालून या आवश्यक गोष्टी पोहचविण्याची काम ते करत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या साथीनंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये भाजीपाल्यापासून ते सर्वच आवश्यक गोष्टी घरपोच पुरविण्याची सुविधा विक्रेत्यांनी केली. परंतु, या गोष्टी पोहचविणाऱ्या डिलेव्हरी बॉय यांच्या सुरक्षितेसाठी कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे मात्र कुठेच दिसले नाही. यासोबतच मागणी अधिक असल्या कारणाने या सामान पोहोच करणाऱ्या लोकांचे कामाचे तास देखील वाढवण्यात आले. सध्या हे डिलिव्हरी बॉय १६ तास काम करत असून, त्यामानाने त्यांना मोबदला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तसेच खाद्य पदार्थ ऑनलाईन ऑर्डर घेऊन घरपोच करणाऱ्या काही कंपन्यांनी लॉकडाउनच्या पूर्वी प्रमाणे मागणी नसल्याचे म्हटले आहे. फूड डिलेव्हरीची ऑर्डर मिळाल्यानंतर त्यातील काही रक्कम उत्पन्न म्हणून मिळत असे, मात्र आता यामध्ये काहीच उत्पन्न मिळत नसल्याने डिलेव्हरी बॉयच्या कामाचे काही तास वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. झोमॅटो या फूड डिलेव्हरी कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून काम करत असलेल्या एकाने फूड डिलेव्हरीची ऑर्डर कमी असल्यामुळे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ काम करत असल्याचे सांगितले. अन्यथा बेरोजगारीची कुऱ्हाड देखील पडण्याची शक्यता असल्याचे त्याने यावेळी म्हटले.
असे कित्येक डिलेव्हरी बॉय सध्या देशभरात असून, जे कमी मिळकतीमध्ये पहिल्या पेक्षा अधिक वेळ काम करत आहेत. शिवाय लॉकडाउनच्या नियमात स्पष्ट नियोजनाच्या अभावामुळे अनेकदा या डिलेव्हरी करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या दंडुकेशाहीला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसात मुंबई, बेंगलोर आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत हाकनाक डिलेव्हरी बॉय ना मारहाण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे एकीकडे लॉकडाउनमधील ताळमेळ नसल्याने होणार त्रास आणि दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दोन्ही समस्यांना तोंड देण्याची वेळ या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना येत असल्याचे चित्र आहे. यासोबतच कामगार कायद्याचे कोणतेही नियम या क्षेत्रात काम करणाऱ्यांना लागू नसून, ते कंपन्यांचे अधिकृत कामगार म्हणून देखील नाहीत. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधा अगदीच तुटपुंज्या आहेत.
अशातच, ऑर्डर केलेल्या ग्राहकांनी डिलेव्हरी ही अगदी घराच्या दारापर्यंतच करण्याच्या मागणीमुळे, सोशल डिस्टंसिंग होत नसल्याची चिन्हे आहेत. आणि डिलेव्हरी बॉयना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कंपन्यांनी कोणतीही अतिरिक्त काळजी पीपीइ पोशाख दिले नसल्याने धोका वाढण्याची संभावना अधिक बळावली आहे. तर अनेक कंपन्यांनी संसर्ग होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी डिलेव्हरी करणाऱ्याने वैयक्तिकरित्या घेण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी दिल्लीत डॉमिनोज या फूड डिलेव्हरी मध्ये काम करणाऱ्या एका डिलेव्हरी बॉयला कोरोनाचा संसर्ग होऊन, पुन्हा ९६ लोकांना याचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर डॉमिनोजने नियमितपणे त्यांच्या सर्व कामगारांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरपोच सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांनी याची खबरदारी घेऊन नियमावली बनवत, वेळच्या वेळेवर डिलेव्हरी करणाऱ्या कामगारांना पुरेसे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त कंपन्यांनी ग्राहकांना देखील जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नियमांचे पालन करतच सेवा पुरवीत असल्याची माहिती देणे महत्वाचे आहे.
कोरोना विषाणूच्या महामारीमूळे उद्योग व्यवसायापासून सगळ्याच क्षेत्राची वाताहत झालेली आहे. त्यामुळे अधिकतर कंपन्यांनी वेतन कपातीचा निर्णय घेतला असून, काही ठिकाणी कामगार कपात करण्यास सुरवात केली आहे. झोमॅटो या फूड डिलेव्हरी कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपातीसोबत, १५ टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. तसेच स्विग्गीने देखील आगामी काळात ११०० कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात अनेक जणांवर बेरोजगारीचे संकट कोसळण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.