"दोन लशींसह मानवतेच्या सेवेसाठी सज्ज; अक्षय उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारता'चीआघाडी"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासी भारतीय दिवस संमेलन 2021 च्या उद्घाटन सत्रात बोलत आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासी भारतीय दिवस संमेलन 2021 च्या उद्घाटन सत्रात बोलत होते. आज प्रवासी भारतीय दिवसानिमित्त 16 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात मोदींनी भारताच्या विविध आघाड्यांवर होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून एकमेकांशी जोडले गेले आहोत. मात्र आपलं मन नेहमीच 'माँ भारती'सोबत जोडलं गेलेलं आहे. गेल्या काही वर्षांत अनिवासी भारतीयांनी इतर देशांमध्ये जाऊन आपली स्वत:ची ओळख बनवून ती मजबूत केली आहे. 

त्यांनी कोरोनाशी भारताने जो लढा दिला, त्याबद्दलही उहापोह केला. भारताने हा लढा नेटाने दिला असल्याचं त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, भारताला आधी पीपीई किट्स, मास्क्स, व्हेंटिलेटर्स आणि टेस्टींग किट्स बाहेरहून मागवावे लागले मात्र आता भारत आत्मनिर्भर बनला आहे. सध्या भारत मानवतेची रक्षा करायला दोन स्वदेशी लशींसह सज्ज झाला आहे. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, जेंव्हा भारत दहशतावादाविरोधात ठामपणे उभा राहिले तेंव्हा जगाला देखील या समस्येशी दोन हात करण्याचे धैर्य प्राप्त झाले. सध्या भारत भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आता भारतातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाखो-करोडो रुपयांची रक्कम थेट पोहोचवली जात आहे. 

हेही वाचा - गुजरातचे 4 वेळा CM राहिलेल्या माधवसिंह सोलंकी यांचं निधन; PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

देशातील गरिबांचा विकास करण्यासाठी जी मोहिम राबवली जात आहे, त्या मोहिमेवर जगभरात चर्चा केली जात आहे. आपण जगाला हे दाखवून दिलं आहे की, अक्षय उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात एक विकसनशील देश देखील आघाडी घेऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi at 16th Pravasi Bharatiya Divas convention India is ready to save humanity with two Made in India COVID-19 vaccines