esakal | कोरोनाचा उद्रेक, कुंभमेळा प्रतिकात्मक घ्या; PM मोदींचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Pm Modi

कोरोनाचा उद्रेक, कुंभमेळा प्रतिकात्मक घ्या; PM मोदींचे आवाहन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. लसीकरण सुरु असलं तरी इतर सोयीसुविधांचा तुटवडा आहे. यातच हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभ मेळ्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना संसर्ग झाला आहे. निरंजनी आखाड्याने महाकुंभाचा शनिवारी शेवट करण्याचा निर्णय घेतला असून या आखाड्याच्या १७ संतांसह ५० पेक्षा जास्त संतांना कोरोना झाला आहे. अजून २०० संतांच्‍या चाचणीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. यावर आता पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंतर गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंतही मोदींनी केली आहे. ट्विटरवरून मोदींनी याची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी विनंती केली की, आता दोन शाही स्नानाचे सोहळे झाले आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रतिकात्मक व्हावा. यामुळे कोरोनाच्या लढ्याला बळ मिळेल. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. सर्व संत, महंतांच्या आरोग्याचीही माहिती घेतली. तसंच प्रशासनाला त्यांच्याकडून सहकार्य केलं जात आहे. यासाठी संतांचे आभारही मानल्याचं मोदींनी सांगितलं.

मोदींनी केलेल्या आवाहानाचा आम्ही आदर करतो. जीवाचे रक्षण हे मोठं पुण्य आहे. माझ जनतेला आवाहन आहे की कोरोनाच्या सद्य परिस्थितीत मोठ्या संख्येनं स्नानासाठी येऊ नये असं स्वामी अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांचा पुढाकार

पाच दिवसांत ७४५ जण पॉझिटिव्ह

निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः याला दुजोरा दिला. त्यांना आखाड्यातच विलगीकरणात ठेवले आहे. मेळ्यात गुरुवारी (ता. १५) सायंकाळी झालेल्या पट्टाभिषेक कार्यक्रमात पुरी सहभागी झाले होते. हरिद्वारचा महाकुंभ सुरू झाल्यापासून सुमारे ७० पेक्षा जास्त ज्येष्ठ साधू कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. ही संख्या वाढत चालली आहे. मेळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. १५) ३३२ जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. कुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. बुधवारी (ता.१४) १३ हजार ४१५ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ११९ पॉझिटिव्ह होते. सोमवार (ता.१२)पासून आतापर्यंत झालेल्या ७९ हजार ३०१ चाचण्यांपैकी ७४५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हेही वाचा: सावधान ! हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग

देव यांच्या छावणीचे निर्जंतुकीकरण

आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. त्रिपाठी बहुगुणा म्हणाले की, महामंडलेश्‍वर कपिल देव यांना ज्या रुग्णालयात दाखल केले होते, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संसर्गापूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यांना डायलिसिसही करावे लागत होते. कोरोनामुळे त्यांचा मंगळवारी (ता. १३) मृत्यू झाला. देव आणि अन्य दहा हजारांपेक्षा जास्त संत व त्यांच्या अनुनयांचे वास्तव्य असलेल्या कंखाल या भागाचे निर्जंतुकीकरण करणार असून तेथे राहणाऱ्या सर्वांचे नमुने घेणार असल्याचे हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. झा यांनी सांगितले. दरम्यान, कुंभमेळ्यात बंदोबस्तासाठी असलेले ३३ कोरोनाबाधित पोलिसही परतीच्या मार्गावर आहेत. या सर्वांनी लशींचे दोन्ही डोस घेतल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: देशात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येने गाठला विक्रमी टप्पा

महाकुंभच्या सांगतेविषयी लवकरच निर्णय

देशातील सर्व १३ आखाड्यांचा समावेश असलेल्या आखाडा परिषदेचे सरचिटणीस महंत हरि गिरी म्हणाले की, कुंभमेळ्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, हे खरे आहे. या स्थितीबाबत आम्ही सर्व आखाड्यांच्या प्रतिनिधींशीची व्हर्च्युअल चर्चा करीत आहोत. महाकुंभाच्या सांगतेबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. कुंभमेळा येत्या ३० रोजी अधिकृतपणे समाप्त होणार आहे. चौथे शाही स्नान हे येत्या २७ रोजी होणार आहे. यात सहभागी होण्याचे नियोजन आखाडा परिषद करीत आहे. पण काही निवडक संतांनाच गंगेत स्नान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

‘निरंजनी’ने माफी मागावा

निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याच्या निर्णयाला अनेक साधू-संतांसह आखाड्यांचाही विरोध आहे. या दोन्ही आखाड्यांनी माफी मागावी, अशी मागणीही होत आहे. जर माफी मागितले नाही तर आखाडा परिषदेतून निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर आखाडे वेगळे होतील, असा इशाराही दिला आहे. मुदतीआधी म्हणजे येत्या ३० पूर्वी कुंभ समाप्त करू नये, असे मत बैरागी आखाड्याने व्यक्त केले आहे.

loading image