पुलवामा हल्ल्याचं विरोधकांनी घाणेरडं राजकारणं केलं; PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख

modi over pulwama
modi over pulwama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर आहेत. आज मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरात मधील केवडीयामध्ये एका सभेत भाषण केलं. या भाषणात त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मोदींनी म्हटलं की, आज मी जेंव्हा इथे अर्धसैनिक दलाची परेड बघत होते तेंव्हा माझ्या मनात आणखी एक चित्र होते. ते चित्र होतं पुलवामा हल्ल्याचं. जेंव्हा संपूर्ण देश आपल्या वीर जवानांच्या मृत्यूने हळहळत होता तेंव्हा विरोधकांकडून या घटनेचे राजकारण केले गेले, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. 

मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी शेजारी देशाकडून ज्याप्रकारची बातमी आली आहे आणि ज्याप्रकारे त्यांच्या देशाच्या संसदेत पुलवामाबाबतचे सत्य स्वीकारले गेले आहे त्यामुळे त्या लोकांचा जगासमोर खरा चेहरा समोर आला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचेच हे उदाहरण आहे. 

मी राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी देशाच्या सुरक्षेच्या हिताच्या दृष्टीने सुरक्षादलाच्या मनोबलासाठी याप्रकारचे राजकारण करु नये. आपल्या स्वार्थासाठी कळत-नकळत देशविरोधी शक्तींना बळ देऊ नये. याप्रकारे आपण आपल्या देशाचे आणि सुरक्षा दलाचे हित करु शकत नाही, असं त्यांनी म्हटलं. 

त्यांनी म्हटलं की, आपल्याला हे कायम लक्षात ठेवलं पाहीजे की, आपल्यासाठी देशाचे हितच सर्वोच्च आहे. जेंव्हा आपण सगळ्यांच्या हिताचा विचार करु तेंव्हाच आपली प्रगती होईल. आजच्या परिस्थितीत जगातील सगळ्याच देशांतील सगळ्याच सरकारांना दहशतवादाविरोधात एकजूट होण्याची नितांत आवश्यकता आहे. शांती-बंधुत्व आणि परस्पराबद्दल आदरभाव हीच मानवतेची ओळख आहे. दहशतवाद आणि हिंसेने कधीही कुणाचेही भले होऊ शकत नाही. 

त्यांनी म्हटलं की, विविधता हेच आपलं अस्तित्व आहे. आपण एक असणं हेच आपलं असामान्यत्व आहे. मात्र लक्षात ठेवा की, भारताची एकता ही दुसऱ्यांना खटकत राहते. आपल्या या विविधतेलाच ते आपली कमजोरी बनवू इच्छित आहेत. अशा प्रकारच्या शक्तींना ओळखून आपल्याला सतर्क रहायला हवं. 

सरदार पटेलांनी सोमनाथचे पुनर्निमाण करुन देशाचा सांस्कृतिक अभिमान परत मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्याचा विस्तार देशाने राममंदिराच्या स्वरुपात पाहिला आहे. आज देश राममंदिरावर सुप्रिम कोर्टाचा निर्णय पाहत आहे तसेच भव्य राममंदिर बनतानि देखील बघत आहे. काश्मीरच्या विकासात जे अडथळे येत होते ते देखील आता मागे टाकून काश्मीर विकासाच्या वाटेवर आहे. मग ते नॉर्थ-इस्ट भागात शांती प्रस्थापित करणे असो, त्यासाठीही पावलं टाकली जात आहेत. आज देश एकतेचे नवे आयाम स्थापन करत आहे. 


कोरोना प्रादुर्भावाबद्दल मोदी म्हणाले की हे संकट अचानक आले. या संकटाने सगळे जगच त्रस्त आहे. मात्र, या संकटाविरोधात ज्याप्रकारे आपण सगळ्यांनी लढा दिला आहे, तो अभूतपूर्व आहे.  सरदार वल्लभभाई पटेलांना श्रद्धांजली वाहून ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेलांनीच शेकडो संस्थानिकांना एकत्र करुन देशाच्या विविधतेला एक शक्ती बनवून भारताला आजचे स्वरुप दिले होते. त्यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त मोदींनी आज स्टॅच्यू ऑफ युनिटीवर जाऊन पुष्पजल अर्पण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी केवडीयमध्ये राष्ट्रीय एकता दिवसाच्या परेडमध्ये सहभाग घेतला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com