
US Capitol मध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामने काही काळासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट स्थगित केलं आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर सुरु असलेला वितंडवाद आज टोकाला गेलेला पहायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून आत घुसून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. या धुमश्चक्रीत एका आंदोलक महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनेनंतर वॉशिंग्टन डिसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शांततेचे आवाहन केले आहे.
Distressed to see news about rioting and violence in Washington DC. Orderly and peaceful transfer of power must continue. The democratic process cannot be allowed to be subverted through unlawful protests.
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2021
मोदींनी म्हटलंय की, वॉशिंग्टन डी.सी. मधील दंगा आणि हिंसाचाराबद्दलच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो आहे. शांतता आणि सुव्यवस्थेने सत्तेचे हस्तांतरण सुरूच राहिले पाहिजे. बेकायदेशीर निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रिया विकृत करु दिली जाऊ शकत नाही.
या पार्श्वभूमीवर ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामने काही काळासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट स्थगित केलं आहे. तर राष्ट्राध्यक्ष पदासाठी नुकतेच निवडले गेलेल्या जो बायडन यांनी म्हटलंय की मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी घेतलेल्या शपथेनुसार संविधानाचे संरक्षण करावे आणि या गोंधळाला लवकरात लवकर आवरतं घ्यावं.
हेही वाचा - Breaking News : ट्रम्प समर्थकांकडून US Capitol मध्ये तोडफोड; अभुतपूर्व असा गोंधळ
गेल्या 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या मतमोजणीवर संशय घेत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तरीही या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांचाच विजय झाल्याचे चित्र होते. या निवडणुकीत झालेल्या विजयाला औपचारिकरित्या घोषित करण्यासाठी सत्र सुरु होतं.
जेंव्हा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये हे सत्र सुरु होतं तेंव्हाच ट्रम्प समर्थकांच्या हिंसक झुंडीने बॅरिकेड्सची तोडफोड करत आत प्रवेश केला. पोलिसांशी त्यांची झटापट झाली. यातील अनेक समर्थकांकडे हत्यारे होती. ट्रम्प समर्थकांनी खिडक्या तोडल्या आणि पोलिसांशी दोन हात केले. या दरम्यानच एका आंदोलक महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहून जाण्यास सांगितले मात्र ही गोष्ट देखील अधोरेखित केली या निवडणुकीत त्यांचाच विजय झाला आहे.