राहुलजी, कुठलाही कागद न धरता 15 मिनिटे बोलून दाखवा : पंतप्रधान मोदी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

नवी दिल्ली : 'कुठल्याही कागदाचा आधार न घेता तुम्ही कर्नाटकमधील तुमच्या सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवा', असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आज (मंगळवार) दिले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत आज पंतप्रधान मोदी यांची पहिली जाहीर सभा झाली. 

नवी दिल्ली : 'कुठल्याही कागदाचा आधार न घेता तुम्ही कर्नाटकमधील तुमच्या सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवा', असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आज (मंगळवार) दिले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत आज पंतप्रधान मोदी यांची पहिली जाहीर सभा झाली. 

'मला 15 मिनिटे संसदेमध्ये बोलू द्या' असे आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले होते. 'मी संसदेत बोललो, तर मोदी उभे राहू शकणार नाहीत', असा दावा राहुल यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांना प्रतिआव्हान दिले. या सभेत मोदी यांनी काँग्रेसवर चौफेर हल्ला केला. राहुल यांचा नामोल्लेख टाळत मोदी यांनी 'नामदार' असा शब्दप्रयोग केला. 'काँग्रेसचे अध्यक्ष नामदार आहेत.. त्यांना कामदारांविषयी काय माहीत असणार?', असा बोचरा सवाल मोदी यांनी केला. 

देशातील प्रत्येक गावात वीज पोचल्याचा उल्लेख करत मोदी यांनी पुन्हा राहुल गांधींवर निशाणा साधला. 'काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष किमान सौजन्यही विसरले आहेत. देशातील प्रत्येक गावात वीज पोचवणाऱ्या सामान्य मजुरांविषयी त्यांनी कौतुकाचा एक शब्दही उच्चारला नाही', असे मोदी म्हणाले. 

"त्यांनी मला आव्हान दिले आहे, की 15 मिनिटे ते बोलले, तर मी त्यांच्यासमोर उभा राहू शकणार नाही. होय! हे खरे आहे.. तुम्ही 'नामदार' आहात.. आम्ही 'कामदार' तुमच्यासमोर बसूही शकत नाही.. हातात कुठलाही कागद न धरता सलग 15 मिनिटे तुम्ही कर्नाटकमधील तुमच्या सरकारच्या कामगिरीबद्दल बोलून दाखवा.. कुठल्याही भाषेत बोला.. इंग्रजी, हिंदी किंवा तुमची मातृभाषा!'', असा थेट हल्ला मोदी यांनी चढविला. 

मोदी उवाच.. 

  • देशाच्या इतिहासाबद्दल काडीचाही आदर नसलेली व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्त्व करत आहे. 
  • 'वंदे मातरम'चा त्यांनी केलेला अपमान पाहून मला धक्काच बसला 
  • ज्या 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती, त्यांच्याविषयी स्वातंत्र्यानंतर देशावर बहुतांश काळ राज्य केलेल्या पक्षाने कधीच काहीही विचार का केला नाही? 
  • जिथे जिथे काँग्रेस आहे, तिथे तिथे विकासाचे सर्व रस्ते बंद असतात.. तिथे फक्त भ्रष्टाचार आणि जातीत तेढ असते.. 
  • 'आम्ही 2009 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोचवू' असे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी 2005 मध्ये जाहीर केले होते. त्या आश्‍वासनाचे काय झाले? 
  • येडियुरप्पा हे कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असतील 
Web Title: PM Modi dares Rahul Gandhi to speak for 15 minutes without a paper