पंतप्रधान मोदींनीच सर्वात आधी दिली होती पीएम केअर्समध्ये देणगी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्ससाठी स्वत:च्या खात्यातून सर्वात प्रथम देणगी दिल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या निधीत पहिल्या पाच दिवसात ३.०७६ कोटी रुपये जमा झाले होते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्ससाठी स्वत:च्या खात्यातून सर्वात प्रथम देणगी दिल्याचे समोर आले आहे. देशातील कोविड-१९ साठी तयार केलेल्या पीएम केअर्स फंडला पंतप्रधानांनी २३ मार्च रोजी २.२५ लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे. २०१९-२० च्या वार्षिक लेखा परीक्षणाच्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. या निधीत पहिल्या पाच दिवसात ३.०७६ कोटी रुपये जमा झाले होते. 

देशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आणि वैद्यकीय सेवेसाठी पीएम केअर्स फंड स्थापन केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मात्र पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी (पीएमएनआरएफ) असताना वेगळ्या पीएम केअर्स फंडची गरज काय, असा सवाल कॉंग्रेसकडून उपस्थित केला गेला आणि त्याच्या कायदेशीर वैधतेवरही प्रश्‍न उपस्थित केले गेले. मात्र केंद्राकडून पीएम केअर्स निधीचे समर्थन केले गेले.पीएम केअर्स स्वेच्छा निधी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. पंतप्रधानांनी स्वत: पहिल्यांदा देणगी देत पीएम केअर्सची सुरवात केली. 

हे वाचा - पँगोंगमध्ये मार खाल्ल्यानंतर चीनने 'अक्साई चीन'कडे वळवला मोर्चा

मोदींनी यापूर्वीही विविध सामाजिक कार्यासाठी देणगी दिली आहे. गेल्यावर्षी पंतप्रधानांनी प्रयागराज येथे कुंभमेळ्यात स्वच्छता मोहिम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या बचत खात्यातून २१ लाख रुपये देणगी दिली होती. दक्षिण कोरियाचा सोल पिस प्राइज मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी बक्षीसाची रक्कम १.३ कोटी रुपये गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी दिली होती. एवढेच नाही तर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वत:च्या बचत खात्यातून २१ लाख रुपयाचा निधी गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात आला. 

हे वाचा - यूकेचे पंतप्रधान करु शकतात मग माेदी का नाही? पृथ्वीराज चव्हाण

परदेशातून ३९.६७ कोटी रुपये प्राप्त 
एका अधिकाऱ्याच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच जनतेच्या सेवेसाठी देणगी देण्यास पुढाकार घेतला आहे. पीएम केअर्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, ३,०७५.८५ कोटी रुपये स्वेच्छा देणगीतून तर ३९.६७ कोटी रुपये परदेशातून प्राप्त झाले आहेत. ३१ मार्च २०२० रोजी आर्थिक वर्ष संपल्यानंतर या निधीत ३,०७६.६२ कोटी रुपये जमा झाले होते. यासंदर्भातील माहिती पीएम केअर्स फंडच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi donate more than rs 2 lakh to pm cares fund