प्रेरणादायी 'कलाम स्मारका'चे मोदींकडून अनावरण

पीटीआय
गुरुवार, 27 जुलै 2017

तमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. "विविधतेत एकता' या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात "अग्नी' क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत

रामेश्‍वर, (तमिळनाडू) - दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभालेल्या स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी आज (गुरुवार) केले. कलाम यांच्या पैकरांबु या मूळ गावी येथे हे स्मारक बांधले आहे. कलाम 2002 ते 2007 या काळात भारताचे राष्ट्रपती होते.

स्मृतीस्थळी कलाम यांच्या समाधीवर फुले वाहून मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. स्मारकाच्या प्रवेशद्वारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम तिरंगा फडकाविला. कलाम यांचे थोरले बंधू ए. पी. जे. महमद मुथुमिरान मरायकायर व अन्य नातेवाईकांची भेट घेतली. या स्मारकाचे प्रवेशद्वार इंडिया गेटच्या धर्तीवर तयार केले आहे. स्मारकाच्या मागील भागात राष्ट्रपती भवनाच्या प्रतिमा उभारली आहे. मोदी यांच्यासह तमिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, केंद्रिय मंत्री राधाकृष्णन, निर्मला सीतारामन, व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते. या वेळी लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. कलाम यांच्या कार्याचा गौरव करणारे फलक त्यांनी हातात घेतले होते.

लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) व केंद्र सरकारच्या अन्य खात्यांनी हे वैशिष्टपूर्ण स्मृतीस्थळ बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. तमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. "विविधतेत एकता' या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात "अग्नी' क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी त्या आवर्जून पाहिल्या व त्याची माहिती घेतली. तसेच डॉ.कलाम यांचा वीणा वाजवितानाच्या रूपातील पुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. असून यात कलाम यांचा ब्रॉंझचा पुतळा व शास्त्रज्ञ व राष्ट्रपती काळातील त्यांची 900 चित्रे व 200 दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

Web Title: PM Modi inaugurates 'missile man' APJ Kalam's memorial on his 2nd death anniversary