वर्षाचा शेवटचा दिवस हा कोविड योद्ध्यांच्या स्मरणासाठी; PM मोदींच्या हस्ते AIIMS चा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

गुजरातमध्ये AIIMS दवाखाना सुमारे 200 एकर जागेवर उभारण्यात आला असून याला 1,200 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 

राजकोट : 2020 या वर्षाचा शेवटचा दिवस हा भारतातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येक योद्धाला आठवण्याचा दिवस असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. कोरोनाविरोधातील लढाईत आपले कर्तव्य प्राणपणाने बजावणाऱ्या लोकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी आज All India Institute of Medical Sciences (AIIMS) च्या गुजरात राज्यातील राजकोटमधील संस्थेचे उद्घाटन केले. व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वर्षाचा हा शेवटचा दिवस लाखो डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना विरोधात लढणारे पहिल्या फळीतील प्रत्येकाला आठवण्याचा दिवस आहे. कोरोनाविरोधातील लढाईत आपलं कर्त्यव्य प्राणपणाने बजावणाऱ्या प्रत्येकाला मी नमन करतो. कितीही कठीण संकट असो, आपण सगळे एकत्र येऊनच प्रभावीपणे दोन हात करु शकतो, हे या वर्षाने दाखवून दिले आहे. 'स्वास्थ्य ही संपदा है' हे आपल्याला 2020 या वर्षाने यथार्थपणे दाखवून दिले आहे. हे वर्ष अनेक आव्हानांनी भरलेले होते. राष्ट्रीय आरोग्य सुविधेचं महत्त्व 2020 हे वर्ष दाखवून देतं तसेच या वर्षाचा निरोप घेताना 2021 या नव्या वर्षातील आव्हानांवरही प्रकाश टाकते.

हेही वाचा - ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन डिसेंबरपूर्वीच भारतात, AIIMS च्या प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं की, जेंव्हा आरोग्याबाबत काही समस्या उद्भवते तेंव्हा आयुष्याशी निगडीत प्रत्येक बाबीवर त्याचा परिणाम होतो. फक्त कुटुंबच नव्हे तर सगळ्या सामाजिक वर्तुळावर त्याचा परिणाम होतो. गुजरातमधील AIIMS चे उद्घाटन करुन ते म्हणाले की, आज देशातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी आणणाऱ्या आणखी एका गोष्टीची सुरवात झाली आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांचा आकडा घसरत आहे. आणि येत्या वर्षात आपण जगातील सर्वांत मोठी लशीकरणाची योजना राबवणार आहोत.

या कार्यक्रमावेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते. त्यांनी म्हटलं की, गुजरातमध्ये AIIMS दवाखाना सुमारे 200 एकर जागेवर उभारण्यात आला असून याला 1,200 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi laid foundation AIIMS said Last day of year is to remember India's frontline COVID warriors