...ही तर हिंदूराष्ट्र निर्मितीची सुरवात - फली नरीमन

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

आदित्यनाथ यांच्या निवडीमागील कारण लोकांना समजले पाहिजे, त्यामुळे नागरिक भविष्यात येणाऱ्या स्थितीचा सामना करण्यास तयार राहतील

नवी दिल्ली - योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू राष्ट्र निर्मितीची सुरवात केली आहे का, असा प्रश्न ज्येष्ठ कायदेपंडित फली नरीमन यांनी उपस्थित केला आहे.

नरीमन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांच्या निवडीवर मोदींना प्रश्न विचारले आहेत. गोरखपूर येथील मठाचे योगी आदित्यनाथ हे महंत आहेत. आदित्यनाथ यांच्या निवडीमागील कारण लोकांना समजले पाहिजे, त्यामुळे नागरिक भविष्यात येणाऱ्या स्थितीचा सामना करण्यास तयार राहतील, असे नरीमन यांनी म्हटले आहे.

नरीमन म्हणाले, ''संविधान धोक्यात आले आहे. आदित्यनाथ यांच्या निवडीमागील रहस्य कोणी समजून घेऊ शकत नसेल तर तो राजकीय पक्षाचा प्रवक्ता आहे किंवा त्याच्या बुद्धी व डोळ्याची चाचणी करण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी याला कितीही विरोध केला तरी, मला विश्वास आहे की एका खास व्यक्तीची निवड करून ते हिंदू राष्ट्रनिर्मितीला सुरवात करत आहेत.''

पंतप्रधान मोदी स्पष्ट वक्ते आहेत. ते शब्दांची मोडतोड करून बोलत नाहीत. त्यांच्यातील उर्जा असाधारण आहे. मी आतापर्यंत असा माणूस पाहिला नाही. मात्र, मी त्यांच्या सर्वच धोरणांचे समर्थन करतो असे नाही, असे नरीमन यांनी सांगितले. 

Web Title: pm modi must be asked If it is beginning of hindu state nariman on yogi as up cm