काँग्रेस हरली म्हणजे देश हरला असं म्हणायचं का? : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिल्यामुळे विरोधक सामान्य मतदारांचा अपमान करत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विरोधकांनी अपमान करू नये, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला. 

नवी दिल्ली : निवडणुका ही लोकशाहीची मोठी ओळख आहे. कित्येक दशकांनंतर देशात एकहाती सत्ता आली असून भाजप ही निवडणूक जिंकल्याने संपूर्ण देश निवडणूक हरल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस हरली म्हणजे पूर्ण देश निवडणूक हरला असे म्हणायचे का? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते आज (बुधवार) राज्यसभेत बोलत होते. 

2019 ची लोकसभा निवडणूक ही पक्षांपुढे जाऊन जनतेने लढविली. 40-45 अंश तापमान असतानाही देशात मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिल्यामुळे विरोधक सामान्य मतदारांचा अपमान करत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विरोधकांनी अपमान करू नये, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला. 

काँग्रेसचा पराभव हा देशाचा पराभव असू शकत नाही. जर असे असेल, तर रायबरेली, अमेठी आणि वायनाडमध्ये देश हरला असे म्हणायचे का? असा सवाल नरेंद्र मोदींनी उपस्थितांना विचारला. अहंकाराला देखील एक मर्यादा असते, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. देशातल्या प्रत्येक कोपऱ्यात भाजपचा विजय झाला आहे, म्हणून देशातल्या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना बिकाऊ म्हणणं चुकीचे आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. भाजपला ऐतिहासिक बहुमत दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व जनतेचे आभार मानले. तसेच संसदेत बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी कानउघडणी देखील त्यांनी यावेळी केली. 

ज्या राज्यात काँग्रेस जिंकली त्या राज्यातील मीडिया विकला गेला असे म्हणायचे का? असा परखड सवाल त्यांनी राज्यसभेत उपस्थित केला. इतर राज्यांत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पराभूत झालेल्यांनी ईव्हीएमवर ठपका ठेवण्यापेक्षा पराभव स्वीकारावा. पराभूत झालेले आत्मचिंतन करत नाहीत, तसेच ते आपल्या चुका मान्य करीत नाहीत. ईव्हीएम देशात काँग्रेसने आणले, मात्र पराभवनंतर ते स्वत:च त्यावर खापर फोडत आहेत. याआधी निवडणुका झाल्यानंतर हिंसाचार, मतदान केंद्र बळकावण्याच्या बातम्या ऐकायला मिळायच्या. मात्र, आता निवडणूक निकालाची टक्केवारी ऐकायला मिळते. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर विरोधकांचा पराभव झाला असून लोकशाहीत हार-जीत होतच असते, हे सर्व पक्षांनी मान्य करावे. जेव्हा आमचा पराभव झाला होता, तेव्हा आम्ही रडीचा डाव खेळलो नव्हतो, असा टोला मोदींनी या वेळी लगावला. 

भाजपचा विजय काँग्रेसला पाहवत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. ओडिशा, आंध्रमध्ये प्रादेशिक पक्षांना बहुमत मिळाले असून प्रादेशिक पक्ष संपतील हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. सध्या देश एका भाग्यवान कालखंडातून जात आहे. याआधीही देशात योजना होत्या, पण आम्ही केवळ योजनांच्या घोषणा केल्या नाहीत, तर प्रभावी अंमलबजावणी केली. विरोधक मात्र केवळ सरकारच्या योजनांचाच विरोध करत राहिले. तंत्रज्ञानाशिवाय नव्या भारताची उभारणी होऊ शकत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi addresses Rajyasabha Slams Congress arrogance