हॅपी बर्थडे, देवेगौडाजी! पंतप्रधान मोदी, राहुल गांधींच्या 'शुभेच्छा'!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

बंगळूर : कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षामध्ये 'किंग मेकर'पेक्षाही अधिक महत्त्व मिळालेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी साधत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेगौडा यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही देवेगौडा यांच्याशी संपर्क साधत त्यांची माफी मागितली. 

1 जून, 1996 ते 21 एप्रिल, 1997 या कालावधीत देवेगौडा यांनी पंतप्रधानपद भूषविले होते. आज (शुक्रवार) त्यांचा 85 वा वाढदिवस आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी दूरध्वनीवरून देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले. 

दुसरीकडे, राहुल गांधी यांनी काल (गुरुवार) देवेगौडा यांच्याशी संवाद साधत 'जेडीएस'शी संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल यांनी देवेगौडा यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. तसेच, 'जेडीएस' म्हणजे भाजपची 'बी टीम' आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली होती. इतकेच नव्हे, तर 'जनता दल (संघ परिवार) आहे', असा उल्लेखही राहुल यांनी केला होता. 

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि देवेगौडा यांच्यात जवळपास दहा मिनिटे संवाद झाला. कर्नाटकमधील सद्यस्थितीवरही दोघांनी चर्चा केली, असेही समजते. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळाल्या आहेत. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस आणि 'जेडीएस'ने निवडणुकोत्तर आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या शुभेच्छांना राजकीय रंगही आला आहे. 

Web Title: PM Narendra Modi and Rahul Gandhi wishes Happy Birthday to HD Deve Gowda