'न्यु इंडिया'साठी सर्व राज्यांनी एकत्र यावे- पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

नीती आयोगाच्या या बैठकीस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वगळता इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते. अरविंद केजरीवालांऐवजी दिल्ली सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना बैठकीस पाठविण्यात आले होते.

नवी दिल्ली- 'न्यु इंडिया' व्हिजनसाठी सर्व राज्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) नीती आयोगाच्या बैठकीत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना मोदी म्हणाले, की एकमताने झालेला GSTचा निर्णय ऐतिहासिक आहे. या बैठकीदरम्यान देशातील निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. नीती आयोगाची या बैठकीत नवीन धोरण तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे या प्रक्रियेबाबत मत मांडण्याची चांगली संधी असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

या बैठकीस सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, सुरेश प्रभु, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी आदी उपस्थित होते.

देशाच्या पुढील 15 वर्षाच्या वाटचालीचा आराखडा तयार करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. नीती आयोग देशासाठी 3 वर्षाचा कृती आराखडा तयार करण्य़ावर काम करत आहे. आयोगाच्या या प्रयत्नांना सर्व राज्यांची मदत लागणार असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: PM narendra modi appeals come together for new india