वर्क फ्रॉम होम बंद करा: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जून 2019

सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम).

नवी दिल्ली : मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचावे आणि घरातून काम करणे टाळावे (वर्क फ्रॉम होम). 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (ता. 12) पार पडली. बैठकीत मोदींनी आपल्या कामाची पद्धत स्पष्ट करत सगळ्या मंत्र्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसले. मोदी यांनी यावेळी स्वत:च्या कार्यशैलीचे उदाहरण देताना, गुजरातचे मुख्यमंत्री होतो त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्र्यांनी नव्याने निवडलेल्या खासदारांची भेट घ्यावी, कारण खासदार आणि मंत्री यांच्यात फार फरक नसतो. पाच वर्षांचा आराखडा बनवून कामाची सुरुवात करा आणि त्याचा परिणाम 100 दिवसात दिसला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

मोदींनी बैठकीदरम्यान मंत्र्यांना अनेक सूचना केल्या आहेत. शिवाय, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये मुस्लीम महिलांसाठी तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यासह इतर अध्यादेशांवरही चर्चा झाली. वेळेवर कार्यालयामध्ये पोहोचण्यावर भर देताना मोदी म्हणाले की, 'सर्व मंत्र्यांनी वेळेत कार्यालयात पोहोचावे आणि काही वेळ काढून अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती घ्यावी. कार्यालयाचे काम कार्यालयामध्येच बसून करा, घरातून काम करणे टाळा. पक्षाचा कार्यकर्ता जर मंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागत असेल तर त्यांना वेळ द्यावा. कॅबिनेट मंत्र्यांनी आपापल्या राज्यमंत्र्यांना खात्याचे काम द्यावे आणि त्यात समन्वय ठेवावा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi asks ministers to reach office by 9:30 am and avoid working from home in Council of Ministers