Lockdown :... म्हणून मोदींनी माजी पंतप्रधान अन् विरोधी पक्षनेत्यांना लावले फोन!

PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी रविवारी (ता.५) माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी फोनद्वारे संवाद साधला.

मोदींनी सर्वप्रथम माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी संवाद साधत सध्या सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा सांगितला. त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांच्याशीही चर्चा केली.  

विरोधी पक्षनेत्यांना लावले फोन

लॉकडाउनबाबत सर्वप्रथम आवाज उठविणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही मोदींनी फोनवरून चर्चा केली. तसेच समाजवादी पार्टीचे मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे प्रमुख आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, अकाली दलचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल, द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके)चे एम.के.स्टॅलिन आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला.

काही सूचना असतील तर नक्की सांगा

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मोदींनी सर्व वरिष्ठ नेत्यांनी फोनद्वारे चर्चेवेळी दिली. तसेच या संदर्भात काही सूचना असतील तर त्याही सांगाव्यात, असेही मोदींनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, तज्ज्ञ, क्रीडा क्षेत्रातील मातब्बर खेळाडू तसेच रेडिओ जॉकीसारखी माध्यमांत काम करणाऱ्या मंडळींशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधत आहेत.

सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

कोरोना व्हायरसबाबत पंतप्रधान मोदींनी ८ एप्रिलला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारेच होणार आहे. या बैठकीला ममता बॅनर्जींनी नकार दिला होता, अशी माहिती मिळाली होती. मात्र, त्यांच्याशीही मोदींनी फोनद्वारे संवाद साधल्याने त्या या बैठकीला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. पंतप्रधान मोदी देशातील जनतेशीही व्हिडिओ संदेशामार्फत संवाद साधत आहेत. संकटकाळात संयम बाळगण्याचे आणि सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com