शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ट्रुडोंना मोदींची मदत, कॅनडाला करणार लशींचा पुरवठा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 11 February 2021

भारताने देशात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. भारत सरकार इतर देशांनाही लशीची मदत करत आहे.

नवी दिल्ली- भारताने देशात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. भारत सरकार इतर देशांनाही लशीची मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी कॅनडालाही (Canada)  मदत करण्याचे आश्वासन दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांना कोरोना लशींचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोदींना फोन करुन आपल्या देशातील आवश्यकतेविषयी सांगितलं. पंतप्रधान कार्यलयाने जारी केलेल्या वक्तव्यानुसार मोदींनी ट्रुडो यांना म्हटलं की, भारताने अनेक देशांना कोरोना लशीचा पुरवठा केला आहे, त्याचप्रकारे कॅनडाला लशींची मदत करण्यासाठी भारत सर्वोतपरी मदत करेल. 

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडने सुनामीचा इशारा घेतला मागे; दक्षिण प्रशांत महासागरात आला...

माहितीनुसार, ट्रुडो यांनी कोविड-19 विरोधातील लढाईत भारताच्या असामान्य औषधीय क्षमतेचे महत्त्वपूर्ण योगदान असणार असल्याचं म्हटलं आहे. भारताने या क्षमतेसह अनेक देशांना मदत केली आहे. ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ट्रुडो यांच्या या भावनेसाठी पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. दोन्ही देशांच्या नेत्यांनी जलवायू परिवर्तन आणि कोरोना महामारीच्या आर्थिक दुष्परिणासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहयोग करण्यावर सहमती दर्शवली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन म्हटलंय की, कॅनाडाने केलेल्या मागणीनुसार मदत करण्यासाठी भारत सर्वोतपरी प्रयत्न करेल. 

भारताने कोणत्या देशांना केली मदत

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोविड लशींचा पुरवठा भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, मॉरिशस, सेशेल्स, श्रीलंका, संयुक्त अरब अमीराती, ब्राझील, मोरक्को, बहारीन, ओमान, कुवैत, इस्त्रायल, अल्जीरिया आणि दक्षिण अफ्रीका या देशांना करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की, कॅरेबियन देश, प्रशांत महासागरातील द्विपीय देश, निकारगुआ, अफगाणिस्तान आणि मंगोलिया या देशांनांही कोरोना लशींचा पुरवठा करण्यात येईल. 
 

भारतातील लसीकरण मोहीम

भारतातील लसीकरण मोहीम प्रगतीपथावर आहे. देशात 16 जानेवारीला लसीकरण सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत देशात 68,26,898 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 56,65,172 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव मनदीप भंडारी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Canada Justin Trudeau corona vaccine supply