Coronavirus : कोरोनाविरूद्ध लढणाऱ्यांसाठी मोदींचे नवरात्र व्रत

वृत्तसंस्था
Wednesday, 25 March 2020

देशात आजपासून हिंदू संस्कृतीनुसार राम नवरात्रीची सुरवात होत आहे. रामनवमीपर्यंत म्हणजेच २ एप्रिलपर्यंत हे नवरात्र चालेल. आज सकाळी नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नवरात्रीचे हे नऊ दिवस देशवासियांसाठी समर्पित करत असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोनामुळे तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २१ दिवस देश लॉकडाऊन राहील असे जाहीर केले. कोरोनाचा फैलाव जास्त प्रमाणात होऊ नये, यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला. या निर्णयाचे देशभरातील लोकांनी स्वागत केले असून, लोक उत्स्पूर्तपणे घरी राहात आहेत... अशात मोदींनी आज ट्विट करत देशवासियांसांठी आणखी एक गोष्ट करण्याचा निर्धार केला आहे.

देशात आजपासून हिंदू संस्कृतीनुसार राम नवरात्रीची सुरवात होत आहे. रामनवमीपर्यंत म्हणजेच २ एप्रिलपर्यंत हे नवरात्र चालेल. आज सकाळी नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून नवरात्रीचे हे नऊ दिवस देशवासियांसाठी समर्पित करत असल्याचे सांगितले. मोदी यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीचे मी स्वागत करतो. दरवर्षी मी नवरात्रीला व्रत ठेवून आईची सेवा करतो. यावर्षी मात्र मी हे नवरात्र डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, पोलिस, मीडियाचे प्रतिनिधी व कोरोनाविरोधात लढणाऱ्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी समर्पित करतो.' असे ट्विट करत मोदींनी हे नवरात्रीचे व्रत कोरोनाविरोधात लढणाऱ्या सर्वांना अर्पण केले आहे. 

देशात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून कोरोनाग्रस्तांची संख्या ५३६ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून पुढील २१ दिवस कोणीही घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे संपूर्ण देश हा १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये गेला असून सर्व राज्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi dedicate Navratri Vrat to Corona fighters