मोदींच्या 'एरोप्लेन मोड'चा खर्च तब्बल 2021 कोटी!

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पंतप्रधान मोदींनी 92 देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण 2021 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये चार्टर्ड विमाने, विमानाची देखभाल आणि हॉट लाइनसाठी हा खर्च करण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परदेश दौऱ्यावरुन सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांच्या मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात परदेशवारीची माहिती देण्यात आली. मोदींनी 92 देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण 2021 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये चार्टर्ड विमाने, विमानाची देखभाल आणि हॉट लाइनसाठी हा खर्च करण्यात आला.

तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यापूर्वी सर्वाधिक परदेश दौरे केले होते. त्यानंतर आता सर्वाधिक दौरे करणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात 113 देशांचे दौरे केले होते. तर सध्याचे पंतप्रधान मोदींनी 92 देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये त्यांनी काही ठराविक देशांना एकापेक्षा अधिकवेळेस भेटी दिल्या आहेत. तसेच माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात 93 देशांचे दौरे केले होते. मात्र, मनमोहनसिंग यांचे हे परदेश दौरे दहा वर्षांसाठी होते. तर इंदिरा गांधी यांचे 113 देशांचे दौरे हे 15 वर्षांच्या कार्यकाळातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या परदेश दौऱ्यासाठी आत्तापर्यंत 2021 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती देण्यात आली.  
 

Web Title: PM Narendra Modi Foreign Visit Travel Costs Rs 2021 Crores