'मोदीजी, तुम्हाला मत दिले आहे; 'तोंडी तलाक' संपवा!'; पीडितेची व्यथा

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

मुस्लिम समाजातील "तोंडी तलाक' पद्धतीवरून निर्माण झाल्याच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर शगुप्ता शाह नावाच्या तलाक पीडित महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही पद्धत संपविण्याची मागणी केली आहे.

सहारनपूर (उत्तर प्रदेश) - मुस्लिम समाजातील 'तोंडी तलाक' पद्धतीवरून निर्माण झाल्याच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर शगुप्ता शाह नावाच्या तलाक पीडित महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही पद्धत संपविण्याची मागणी केली आहे.

दोन अपत्यांची आई असलेल्या या महिलेला तिसऱ्यांदा दिवस गेले. तिसऱ्यांदा पुन्हा मुलगी होईल या भीतीने पती शमशद सय्यद याने तिला गर्भपात करण्याचा आग्रह धरला. मात्र, शगुप्ताने गर्भपातास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने तोंडी तलाक देण्यापूर्वी तिचा प्रचंड छळ केला. निर्दयपणे मारहाणही केली आणि रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर तिला पोलिसांच्या मदतीने तिने थेट पंतप्रधानांकडेच आपली व्यथा मांडली. "माझी नम्र विनंती आहे की, कृपया गरीब आणि असहाय्य महिलांना मदत करा. मी तुम्हाला विनंती करते की अशा (तोंडी तलाकसारख्या) राक्षसी प्रथा बंद करा. ज्यामुळे मला आणि माझ्यासारख्या इतर पीडितांना न्याय मिळेल आणि आम्हाला सन्मानाने जगता येईल', अशा शब्दांत तिने मोदी यांना आवाहन केले आहे.

'मी मोदींना तोंडी तलाक प्रथा संपविण्याबाबत लिहिले आहे. त्यासाठी मी त्यांना मत दिले आहे. मला आशा आहे की मला न्याय मिळेल', अशी माहिती तिने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Web Title: PM Narendra Modi gets SOS from pregnant triple talaq victim