असीम धैर्य दाखवणाऱ्या जवानांसाठी एक दिवा लावा; दिवाळीच्या मोदींनी दिल्या सदिच्छा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

त्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला काल देशातील जनतेला एक भावनिक आवाहन देखील केलं आहे. 

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला दिवाळीनिमित्त सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करुन या सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक सदिच्छा! हा सण तुमच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट प्राप्त होवो. प्रत्येकाला समृद्धी आणि निरोगी आयुष्य मिळो, असं त्यांनी म्हटलंय. 

तसेच त्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला काल देशातील जनतेला एक भावनिक आवाहन देखील केलं. मोदींनी म्हटलंय की, देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना सलाम करण्यासाठी देखील एक दिवा जरुर  लावा. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, या दिवाळीला, निर्भयपणे आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना सलाम करणाऱ्यासाठी एक दिवा जरुर लावा. सैनिकांच्या या धैऱ्याला फक्त शब्दांद्वारे कृतज्ञता व्यक्त केली जाऊ शकत नाही. आम्ही सीमेवर असणाऱ्या या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी देखील कृतज्ञ आहोत. 

हेही वाचा - Bihar Election - मुख्यमंत्री कोण? NDA च्या बैठकीत झाला निर्णय; राज्यपालांकडे करणार दावा
मोदींनी आपल्या अलिकडच्याच 'मन की बात' या कार्यक्रमातील एक ऑडीओ क्लिपदेखील शेअर केली आहे. ज्यात त्यांनी देशवासीयांना सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांनी असंही म्हटलंय की जरी कोरोनायोद्धे आणि सीमेवरचे योद्धे आपल्या घरी राहून प्रियजनांसोबत दिवाळी साजरी करु शकत नसले तरीही संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दिवाळीनिमित्त देशवासीयांना सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, दिवाळी हा स्वच्छतेचा उत्सव देखील आहे. त्यामुळे आपल्याला प्रदुषणापासून मुक्त, पर्यावरणाला अनुकूल आणि स्वच्छ दिवाळी साजरी करुन या निसर्गाचा सन्मान करायचा आहे. हा सण आपल्याला मानवतेच्या सेवेच्या दिशेने जाण्यासाठी प्रेरित करतो. ज्याप्रकारे एखादा प्रज्वलित दिवा इतर अनेक दिव्यांना प्रज्वलित करतो, त्याचप्रकारे आपण समाजातील गरिब, असहाय आणि गरजू लोकांच्या आयुष्यात आनंद वाटून आशा आणि समृद्धीचा दिवा बनुयात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi greets Indians on diwali festival