अनिल अंबानींसाठी पंतप्रधान मोदी बनले दलाल: राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

आता जनतेने निर्णय घेतला पाहिजे. अनिल अंबानींना मदत करणाऱ्या पंतप्रधानांना तुरुंगात पाठविले पाहिजे. माझ्याविरोधात कसलीही चौकशी करा, आम्ही काहीच केले नाही. तसेच तुम्ही राफेलची चौकशी करा.

नवी दिल्ली : राफेल कराराबाबत देशाच्या मंत्र्यांना माहिती नव्हते, पण अनिल अंबानींना याबाबत पूर्वीच माहिती होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पंतप्रधानांनी अनिल अंबानींसाठी दलाली केली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, ''राफेल कराराप्रकरणी एक ई-मेल समोर आला आहे. राफेल करारापूर्वी पंधरा दिवस अनिल अंबानी यांनी फ्रान्ससोबत मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हा करार झाला. पंतप्रधान त्यानंतर दौऱ्यावर गेले आणि हा राफेल करार झाला. भारताच्या संरक्षणमंत्र्यांना याबाबत माहिती नव्हते. अधिकाऱ्यांना आणि एचएएलला माहिती नाही. पण, हे सर्व अनिल अंबानींना माहिती होते. पंतप्रधान मोदी मध्यस्थाची भूमिका बजावत होते. याबाबत कारवाई झाली पाहिजे. एकामागून एक या कराराबाबत सत्य बाहेर येत आहे. राफेलप्रकरणी आज संसदेत सादर होणारा अहवाल हा कॅगचा नसून, चौकीदाराचा अहवाल आहे. पंतप्रधान हे भ्रष्ट आहेत. पंतप्रधानांनी गोपनियतेचा भंग केला. पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेचा खेळ केला आहे.''

आता जनतेने निर्णय घेतला पाहिजे. अनिल अंबानींना मदत करणाऱ्या पंतप्रधानांना तुरुंगात पाठविले पाहिजे. माझ्याविरोधात कसलीही चौकशी करा, आम्ही काहीच केले नाही. तसेच तुम्ही राफेलची चौकशी करा. संरक्षण मंत्रालयाला याबाबत काहीही माहिती नाही, मग अनिल अंबानींना कसे काय माहिती? चौकीदार प्युअर असूच शकत नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Web Title: PM Narendra Modi has done is treason and in violation of Official Secrets Act in Rafale deal says Rahul Gandhi