नोटाबंदी हा देशाला झटका नव्हता- नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले असल्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 

नवी दिल्ली- नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले असल्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळातली पहिलीच मुलाखत एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. यावेळी त्यांनी राम मंदिर, नोटाबंदी, उर्जित पटेल या सारख्या विषयांवर त्यांनी भाष्य केले. उर्जित पटेलांच्या विषयावर बोलताना मोदी म्हणाले की, राजीनामा देण्याआधी 6-7 महिन्यांपूर्वीच पटेल आपल्याकडे आले होते. त्यांनी तसे लेखी दिलेही आहे. यामुळे पटेल राजकीय दबावाला बळी पडल्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी गव्हर्नर म्हणून चांगले काम केल्याचा खुलासाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

राममंदिरावरही भाष्य
मोदींनी राममंदिराबाबत भाष्य करताना म्हटले आहे की, राम मंदिरासाठी सरकार अध्यादेश आणणार नसल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. घटनात्मक मार्गानंच सरकार राम मंदिर उभारणार असल्याचं मोदींनी मुलाखतीतून स्पष्ट केलं. तसेच 70 वर्षं देशात सत्ता उपभोगलेल्यांमुळेच राम मंदिर झालं नसल्याचेही मोदींनी सांगितले आहे. 

पाच राज्यात झालेल्या पराभवार स्पष्टीकरण
या निवडणुकांच्या निकालावर मोदी म्हणाले की, तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपची सत्ता येईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु छत्तीसगडमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचं निकालांवरून स्पष्ट झालं. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपविरोधात वातावरण (अँटी इन्कम्बन्सी) असल्याचा आम्हाला फटका बसला. परंतु त्यानंतर हरियाणातील स्थानिक निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये भाजपानं स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. जय आणि पराजय हेच एक मापदंड नसल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. 

पाकीस्तानला एका सर्जिकल स्ट्राईकने शहाणपण येणार नाही
सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावर बोलताना मोदी म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक करूनही पाकिस्तानच्या वर्तणुकीत काहीही बदल झालेला नाही. एका युद्धानं पाकिस्तान हा सुधारणारा देश नाही. तसेच असा विचार करणं ही मोठी चूक आहे. पाकिस्तानला सुधारण्यास आणखी वेळ लागेल.

काँग्रेसवर थेट आरोप
2019 च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्यावर जोरदार हल्ला चढवून येणाऱ्या काळातील राजकीय 'युद्धा'चे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, 'ज्यांच्या चार पिढ्यांनी देश चालवला आणि जे स्वतःला 'फर्स्ट फॅमिली' समजतात ते जामिनावर बाहेर आलेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप आहे. ही मोठी गोष्ट आहे. जी मंडळी त्यांच्या सेवेत आहेत, ती हे सत्य लपवून वेगळ्याच गोष्टी पुढे करण्याचा प्रयत्न करताहेत.

Web Title: PM Narendra Modi Interview PM Modi's first interview of 2019