राजकीय घराणेशाही लोकशाहीत हुकूमशाही आणते; युवा संसदेत PM मोदींचं मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

मागच्या वर्षी 2019 मध्ये पहिल्यांदा हा समारंभ आयोजित केला होता.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात (National Youth Parliament Festival - NYPF) उपस्थित आहेत. त्यांनी आज युवकांसमोर स्वामी विवेकानंदांबाबत भाष्य केलं. तसेच त्यांनी देशाच्या आताच्या परिस्थितीबाबतही या अनुषंगाने भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, आताही असे लोक आहेत ज्यांचा विचार, आचार, ध्येय असं सर्वकाही आपल्या परिवाराचे राजकारण आणि राजकारणातील आपल्या परिवाराला वाचवणे हेच आहे. हा राजकीय वंशवाद लोकशाहीमध्ये हुकूमशाही सोबतच अकार्यक्षमतेस चालना देतो. 

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, काळ पुढे सरकत राहिला, देश स्वतंत्र झाला मात्र आजही आपण पाहतो की स्वामी विवेकानंदांचा प्रभाव आजही कायम आहे. अध्यात्माबाबत जे विवेकानंदांनी सांगितलं, जे राष्ट्रवाद-राष्ट्रनिर्माणाबद्दल सांगितलं ते सारे विचार आपल्या मनमंदिरात तेवढ्याच तीव्रतेने प्रवाहित होतात. स्वामी विवेकांनंदानी आपल्याला आणखी एक अनमोल भेट दिली आहे. ही भेट आहे व्यक्तीच्या निर्मितीची, संस्थांच्या निर्मितीची, मात्र या साऱ्याची चर्चा फारच कमी होते. स्वामी विवेकानंदांनीच त्या काळात म्हटलं होतं की, निडर, धाडसी, स्वच्छ मनाचे, आणि आकांक्षी युवकच या देशाच्या उज्वल भविष्याचा पाया आहेत.

पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, आताही असे लोक आहेत ज्यांचा विचार, आचार, ध्येय असं सर्वकाही आपल्या परिवाराचे राजकारण आणि राजकारणातील आपल्या परिवाराला वाचवणे हेच आहे. हा राजकीय वंशवाद लोकशाहीमध्ये हुकूमशाही सोबतच अकार्यक्षमतेस चालना देतो. राजकीय वंशवाद, राष्ट्र प्रथम याऐवजी फक्त मी आणि माझं कुटुंब याच भावनेला मजबूत करतो. हे भारतातील राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचे महत्त्वपूर्ण कारण आहे.  पुढे त्यांनी म्हटलं की, आजचा दिवस यासाठी देखील विशेष आहे कारण यावेळची युवा संसद देशाच्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होत आहे. हा सेंट्रल हॉल आपल्या संविधानाच्या निर्मितीचा साक्षीदार आहे. मोदींनी म्हटलं की, आपल्या स्वांतत्र्यलढ्यातले अनेक सेनानी विवेकानंदांमुळे  प्रभावित झाले होते. जेंव्हा या स्वांतत्र्य सैनिकांना अटक केली गेली तेंव्हा त्यांच्याकडे स्वामींजीचे साहित्य सापडले. हे साहित्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी प्रेरणा देते असे इंग्रजांना आढळले.

मोदींनी म्हटलं की, स्वामीजी म्हणायचे की, जुन्या धर्मांनुसार नास्तिक तो असतो जो ईश्वरावर विश्वास ठेवत नाही. मात्र नवा धर्म म्हणतो की नास्तिक तो आहे जो स्वत:वर विश्वास ठेवत नाही. ते युवकांवर विश्वास ठेवायचे. आपल्याला देशाला पुढे न्यायची संधी गमवायची नाहीये. देशाची पुढील 25 ते 30 वर्षांची वाटचाल महत्त्वपूर्ण आहे. युवकांना या युगाला भारताचं युग बनवायचं आहे. युवकांनीच आत्मनिर्भर भारताची वाट तयार करण्यासाठी पुढे यायला हवं. 

हेही वाचा - 'सीरम' लसीचे तीन ट्रक पहाटे रवाना; पुण्यातून देशभरात होणार वितरण

या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय क्रिडा मंत्री किरन रिजिजु देखील उपस्थित आहेत. या दरम्यान महोत्सवाचे तीन राष्ट्रीय विजेते देखील आपले विचार मांडणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतची माहिती दिली होती.  एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचा उद्देश 18 ते 25 वर्षे वयाच्या युवकांचे विचार ऐकणे हा आहे. कारण येणाऱ्या काळात मताचा अधिकार बजावून तसेच विविध क्षेत्रात ते कामगिरी बजावणार आहेत. NYPF ची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 31 डिसेंबर 2017 च्या मन की बातमध्ये व्यक्त केल्या गेलेल्या विचारांवर आधारित आहे. मागच्या वर्षी 2019 मध्ये पहिल्यांदा हा समारंभ आयोजित केला होता. 

हेही वाचा - मला दुःख देऊ नका!;रजनीकांत यांची चाहत्यांना विनंती

PMO ने दिलेल्या माहितीनुसार, दुसरा NYPF ऑनलाइन माध्यमातून 23 डिसेंबर 2020 ला आयोजित केलं होतं. या पहिल्या टप्प्यात देशातील 2.34 लाख युवकांनी भाग घेतला होता. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी 12 ते 16 जानेवारी या दरम्यान केलं जातं. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते.  हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने NYPF चे देखील आयोजन केलं जातं.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM narendra Modi second National Youth Parliament Festival 12 January Swami vivekanand Birth anniversary