पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीयांशी संवाद साधला. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती आणि कोरोनाबाधित रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलतील याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीयांशी संवाद साधला. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती आणि कोरोनाबाधित रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलतील याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून मोदी यांनी आज सहाव्यांदा जनतेशी संवाद साधला. भारत आता अनलॉक-2 मध्ये प्रवेश करत आहे. या संदर्भातील मार्गदर्शन तत्वे सरकारकडून सोमवारी रात्री जारी करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे-

- प्रधानमंत्री गरीब कल्यान योजनेमुळे देशातील 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवण्यात आले आहे. आता प्रधानमंत्री गरीब कल्यान योजनेचा विस्तार दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी 90 हजार कोटी खर्च येणार आहे. मागील महिन्यांतील खर्च यात जोडल्यास आतापर्यंत 1.5 लाख कोटी खर्च यासाठी करण्यात आला आहे.  

- संपूर्ण भारतासाठी एक राशनकार्डची योजना तयार केली जात आहे. यामुळे स्थलांतरित मजूरांना कोणत्याही राज्यात याचा लाभ घेता येणार आहे.

-भारताने योग्यवेळी टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.  वेळीच टाळेबंदी केल्याने लाखो जीव वाचले आहेत. इतर देशांमध्ये मृत्यूंचे प्रमाण वाढत असताना, आपण परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

- टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांनी ज्याप्रकारे नियमांचं पालन केलं, त्याप्रमाणे अनलॉकमध्ये पालन करण्याची गरज आहे. कंटेंमेंट झोनमध्ये विशेष खबरदारी घेणे गरजेचं आहे. तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांना समज देणे आवश्यक आहे.

-अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अडीच पट आणि ब्रिटनच्या लोकसंख्येच्या 12 पट नागरिकांना आपण मोफत अन्न पुरवलं आहे.

- टाळेबंदी लागू केल्यानंतर नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन झाले. मात्र, अनलॉक 1 सुरु झाल्यापासून नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर नागरिकांनी अधिक सतर्क राहायला हवं.

-देशात एकही नागरिक उपाशी पोटी झोपला नाही पाहिजे, या दृष्टीने सरकार काम करत आहे.

- गेल्या तीन महिन्यात 20 कोटी नागरिकांच्या खात्यात 31 हजार कोटी जमा करण्यात आले आहेत.

-5 किलो गहू किंवा तांदूळ गेल्या तीन महिन्यात नागरिकांना देण्यात आले आहेत, तसेच 1 किलो दाळ दर महिन्याला देण्यात आली आहे. यापुढे नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे.

- देश अनलॉक 2 मध्ये प्रवेश करत आहे, याचवेळी पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. शेतकऱ्यांसाठी हा ऋतू महत्वाचा असतो. त्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच पावसाळ्यात सर्दी, ताप यासारखे आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi speach today 10 main points