पंतप्रधान मोदींचे भाषण फ्लॉप; भाजपने डिस्लाईक बटण केले ब्लॉक!

टीम ई-सकाळ
Tuesday, 20 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणावरून त्यांना डिस्लाईक करण्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपच्या यू ट्यूबवरून डिस्लाईकचे बटन हटविण्यात आले. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. दसरा-दिवाळीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी कोणती घोषणा करतात की काय? अशी अपेक्षा असताना, केवळ कोरोना संदर्भात निष्काळजीपणा करू नका, असा संदेश देऊन पंतप्रधान मोदींचे भाषण संपले. दर वेळी मोदींचे भाषण किमान 20 ते 25 मिनिटांचे असते. पण, आजचा संदेश केवळ पाच मिनिटांत संपला. परंतु, मोदींच्या या भाषणावरून त्यांना डिस्लाईक करण्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपच्या यू ट्यूबवरून डिस्लाईकचे बटन हटविण्यात आले. 

आणखी वाचा - काय म्हणाले पंतप्रधान मोदी; वाचा सविस्तर बातमी

काय घडले? 
प्रचंड उत्सुकता असताना पंतप्रधान मोदींचे भाषण अगदीच किरकोळ असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपच्या यू ट्यूबवरून डिसलाईकचे बटन हटविण्यात आले. कारण भाषण सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांतच मोदींच्या व्हिडिओला 4 हजार 330 डिसलाईक्स आले होते. भाषण पुढे पुढे जाईल तशी डिसलाईक्सची संख्या  वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचे बटनच काढून टाकण्यात आले. मोदींचे भाषण हे भाजपच्या यू ट्यूब पेजवर केवळ 2 हजार 100 जण पाहत होते. त्यावरून सोशल मीडियात टीका सुरू झाली. एरवी मोदींच्या भाषणावर त्यांच्या समर्थकांच्या उड्या पडत असतात. परंतु, केवळ दोन हजार लाईव्ह प्रेक्षक असल्याचे पाहून भाजपच्या समर्थकांनाही धक्का बसल्याचे मानले जात आहे.  आजच्या मोदींच्या भाषणात कोणालाच रस नसल्याचे दिसून आले.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi speech bjp removed youtube dislike button