मोदींचे विरोधकांना चॅलेंज; 'आंदोलकांना शहरी नक्षलवाद्यांची चिथावणी' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज झारखंडमधील बरहैत येथील भाजपच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीकास्त्र डागले.

बरहैत (झारखंड) : प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देऊ, कलम-370 पुन्हा लागू करू आणि तोंडी तलाकचा कायदा रद्द करू, अशी घोषणा हिम्मत असेल, तर कॉंग्रेसने करून दाखवावी, असे जाहीर आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले.सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मुद्दे लोकशाहीमार्गाने सरकारसमोर चर्चेसाठी मांडावेत, असे आवाहन मोदींनी केले. देशातील युवकांना चिथावणी देण्याचे प्रयत्न शहरी नक्षलवादी करत आहेत, असा आरोपही मोदींनी केला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्यावरून मोदींनी आज झारखंडमधील बरहैत येथील भाजपच्या प्रचारसभेत विरोधकांवर टीकास्त्र डागले. देशातील मुस्लिम सुमदायाच्या नागरिकांमध्ये विरोधी पक्ष भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. मात्र सुधारित नागरिकत्व कायद्याचा देशातील कुठल्याही नागरिकाला फटका बसणार नाही, असे मोदी म्हणाले.

आणखी वाचा - विद्यार्थ्यांवर लाठीमार करणारा; ABVP, RSSचा तरुण नाही

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत मोदींनी नव्या कायद्याच्या मुद्यावरून विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. मोदी म्हणाले, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मी उघड आव्हान करतो की, त्यांनी हिम्मत असेल तर पाकिस्तानी व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देऊ अशी घोषणा करून दाखवावी. हिम्मत असेल तर मोदींनी रद्द केलेले काश्‍मीरबाबतचे कलम 370 पुन्हा आणून दाखवावे. असे केल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. देशातील युवकांना बर्बाद करण्याचा खेळ कॉंग्रेसने बंद करावा. त्यातून कोणाचेही भले होणार नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य उदध्वस्त होईल अशा प्रकारचे राजकारण करण्याचे थांबवा, असेही मोदी या वेळी म्हणाले. 

jharkhand election 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi statement urban naxalites and violence against caa