PM नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन; म्हणाले, ते आदर्शांवर ठाम असत

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 23 January 2021

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता. त्यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या आदर्शांप्रती सदैव ठाम राहत असत, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. आदर्शांबाबत बाळासाहेब ठाम राहत असत. लोकहितासाठी त्यांनी अथक काम केले आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता. त्यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. गतवर्षी विधानसभा निवडणुकीनंतर अनेक वर्षे एकत्र लढलेल्या भाजप-शिवसेनेने युती संपुष्टात आणली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. राज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे हे करत आहेत. 

हेही वाचा- बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येणार एकत्र

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे साहस, निडर नेतृत्त्व आणि भारताच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नेहमी त्यांचे स्मरण केले जाईल. जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन, असे त्यांनी म्हटले. 

दरम्यान, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुर्णकृती पुतळ्याचे अनावरण आज (शनिवारी) जन्मदिनी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा समोरील वाहतुक बेटावर हा नऊ फुटी ब्रॉंझचा पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी 1200 किलो ब्रॉन्झ धातू वापरण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमीत्त या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

हेही वाचा- भाजपचा महाविकास आघाडीला खणखणीत टोला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर भातखळकर कडाडले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi Tributes to Balasaheb Thackeray on his Jayanti