जगाचाही आमच्यावर विश्‍वास, लोकशाही मूल्यांना आम्ही बांधील - पंतप्रधान मोदी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला असला तरी एकशे तीस कोटी भारतीयांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा अद्यापही बुलंदच आहेत, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

नवी दिल्ली - कोरोना संसर्गामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला असला तरी एकशे तीस कोटी भारतीयांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा अद्यापही बुलंदच आहेत, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत-अमेरिका व्यूहरचनात्मक भागीदारी व्यासपीठाने (यूएसआयएसपीएफ) आयोजित केलेल्या तिसऱ्या नेतृत्व परिषदेत मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज भाषण केले. ‘नव्या आव्हानांची दिशा’ हा या परिषदेचा यंदाचा विषय होता.

मोदी म्हणाले की, लोकसंख्या १३० कोटी आणि स्रोत मर्यादित अशी परिस्थिती असतानाही भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असून रुग्ण बरे होण्याचा वेगही वाढत आहे. गेल्या काही महिन्यात भारतात अनेक मोठ्या सुधारणा झाल्या. यामुळे उद्योग करणे सोपे झाले असून लालफितीचा कारभारही कमी झाला आहे. भारताने पारदर्शी करव्यवस्था अमलात आणली असून यामुळे प्रामाणिक करदात्यांना संरक्षण मिळाले आहे. अनपेक्षितपणे आलेल्या संसर्गाने अनेक गोष्टींवर परिणाम केला आहे, देशाच्या सहनशीलतेची आणि आरोग्य व आर्थिक व्यवस्थेची परीक्षा पाहिली आहे. तरीही या संसर्गाचा भारतीयांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेवर काहीही परिणाम झाला नसून त्या बुलंदच आहेत.

मोदी म्हणाले,‘‘कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्यावर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यावर सुरवातीपासूनच भर देणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारत आहे. जगाचाही भारतावर विश्‍वास आहे. भारत हा राजकीय स्थैर्य आणि धोरण प्रवाहीपणा असलेला देश असून लोकशाही मूल्यांना आम्ही बांधील आहोत.’’ पंतप्रधान मोदींनी या परिषदेत मार्गदर्शन केल्याबद्दल ‘यूएसआयएसपीएफ’चे अध्यक्ष मुकेश अघी यांनी मोदींचे आभार मानले. सोमवारपासून सुरू झालेल्या सात दिवसांच्या या परिषदेत अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भाषणे झाली आहेत. 

हे वाचा - अमेरिकेत लशीचा मुहूर्त ठरला पण तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

भारत कोरोनाविरोधात लढण्यासाठी भक्कमपणे उभा राहिला. देशात जबाबदारीने लॉकडाऊन करण्यात आलं. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वात कमी आहे. जगात पीपीई किट तयार करण्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचंही मोदींनी सांगितलं. गरीबांना वाचवण्यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये भारताचा एकच उद्देश होता तो म्हणजे गरीबांचे रक्षण करणं. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून जवळपास 80 कोटी लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याचं मोदी म्हणाले.

भारत अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत करण्यावर भर असून आम्ही आमच्या बँकिंग सिस्टिमला मजबूत केलं आहे. आज जग आमच्यावर विश्वास ठेवत आहे. भारत जगासाठी गुंतवणुकीची सर्वात चांगली बाजारपेठ आहे. उद्योगांसाठी भारताने चांगलं वातावरण तयार केलं. तसंच भारत आवडतं ठिकाण बनेल. गूगल, अॅमेझॉन सारख्या कंपन्यां बराच काळ झालं गुंतवणुकीची योजना आखत असल्याचं मोदींनी सांगितलं. 

हे वाचा - कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपाचारासाठी WHOकडून स्वस्त औषधाची शिफारस

मोदी म्हणाले की, जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्मिती भारतात होते. सगळे भारतीय आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वांचे एकच ध्येय आहे ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. भारत यामुळे ग्लोबल फोर्स मल्टिप्लायर म्हणून नक्कीच पुढे येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi at usispf 3rd annual leadership summit