'बापूंना नोटेवरूनही गायब केले जाणार नाही ना'

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नरेंद्र मोदी हेच खादीचे सर्वांत मोठे ब्रॅंड ऍम्बॅसेडर आहेत.
- व्ही. के. सक्‍सेना, अध्यक्ष, केव्हीआयसी

नवी दिल्ली : खादी ग्रामोद्योग विभागाच्या दिनदर्शिकेवरून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे छायाचित्र हटवून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राची प्रतिष्ठापना करण्याच्या वादात आता खुद्द पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) उडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रपित्याच्या या अनोख्या "हद्दपारी'मागे नेमके कोण आहे, हेही देशवासीयांना आपोआपच समजले आहे. दुसरीकडे गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना, आता बापूंना भारताच्या चलनी नोटेवरूनही गायब केले जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली आहे.

"खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनला'ही (केव्हीआयसी) या वादात मोदी राजवटीची वकिली करण्यासाठी उतरविले गेले आहे. या संस्थेचे अध्यक्ष व्ही. के. सक्‍सेना यांनी सांगितले, की नरेंद्र मोदी हेच खादीचे सर्वांत मोठे ब्रॅंड ऍम्बॅसेडर आहेत. भाजपनेही सायंकाळी उशिरा हाच सूर आळवला. या खात्याचे मंत्री कलराज मिश्र यांनी, "गांधीजींचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही,' असे सांगून वेळ मारून नेली.

तुषार गांधी यांच्या म्हणण्यानुसार, मोदी स्वतःची प्रतिमा वाढविण्यासाठी बापूंचे नाव वापरून घेतात. आता चलनी नोटांवरूनही गांधीजींना गायब केले जाईल का, याचा विचार मी करतो, असेही तुषार यांनी सूचकपणे नमूद केले.

"पीएमओ'तूनही या वादावर टिप्पणी करण्यात आली. मात्र, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याचे अधिकृत नाव घेण्याऐवजी "सूत्र' असा शब्द वापरण्यात आला. या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेसच्या 50 वर्षांच्या राजवटीत खादीची विक्री दोन ते पाच टक्‍क्‍यांच्या वर कधी गेली नव्हती. गेल्या दोन वर्षांतच ही विक्री 34 टक्‍क्‍यांवर झेपावली ती केवळ मोदी यांच्या प्रयत्नांमुळे. खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिकेवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटविण्याची ही पहिलीच वेळ नाही. खुद्द "केव्हीआयसी'च्या धोरणांमध्ये 1996, 2002, 2005, 2011 व 2012 या अलीकडच्या वर्षांत व "यूपीए'ची राजवट असतानाही वेळोवेळी मोठे बदल केले गेले. हा वाद अनावश्‍यकरीत्या वाढविणाऱ्यांना ही बाब माहिती असायला हवी.

नरेंद्र मोदी हेच खादीचे सर्वांत मोठे ब्रॅंड ऍम्बॅसेडर आहेत.
- व्ही. के. सक्‍सेना, अध्यक्ष, केव्हीआयसी

Web Title: pmo jumps into controversy regarding Mahatma Gandhi