esakal | उत्तर प्रदेश पोलिसांना पश्चाताप; प्रियांका गांधींसोबतच्या वर्तनाबाबत मागितली माफी
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांकडून दोघांसोबत गैरवर्तन करण्यात आलं.

उत्तर प्रदेश पोलिसांना पश्चाताप; प्रियांका गांधींसोबतच्या वर्तनाबाबत मागितली माफी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - हाथरस प्रकरणावरून देशभरात उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून दोघांसोबत गैरवर्तन करण्यात आलं. यामध्ये सुरुवातीला राहुल गांधींना धक्काबुक्की आणि खाली पाडण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी यांच्यासोबत एका पोलिसाकडून झालेल्या गैरवर्तनानंतर उत्तर प्रदेश पोलिसांबद्दल आणखी संताप व्यक्त करण्यात आला.

आता या प्रकाराबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी पश्चाताप व्यक्त केला आहे. ट्विटरवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात आहे अशी माहिती दिली. 

उत्तर प्रदेश पोलिस उपायुक्त मुख्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसंच वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकाराच्या चौकशीनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच सज्ज असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे.

हे वाचा - काँग्रेसला उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायचीय; योगींचा गंभीर आरोप

हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जात होत्या. त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊ नये यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावेळीच एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रियांका गांधींचा ड्रेस धरला होता. छत्तीसगढच्या काँग्रेस नेत्या आणि राज्यसभा खासदार छाया वर्मा यांनी महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना या प्रकरणी दोन खासदारांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रात दोन्ही नेत्यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींसोबत चुकीचं वर्तन केलं. दोषी पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी. तसंच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.