योगींच्या राज्यात गुंडाराज; दारु माफियांनी केला जीवघेणा हल्ला; पोलिसाचा मृत्यू

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा गुंडाराज असल्याचं दिसून आलं आहे. कानपूरमध्ये झालेल्या बिकरूची पुनरावृत्ती झाली आहे. पोलिस अवैध दारु व्यवसाय बंद करण्यासाठी गेले असताना दारु माफियांनी पोलिसांवरच हल्ला केला.

लखनऊ - उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा गुंडाराज असल्याचं दिसून आलं आहे. कानपूरमध्ये झालेल्या बिकरूची पुनरावृत्ती झाली आहे. पोलिस अवैध दारु व्यवसाय बंद करण्यासाठी गेले असताना दारु माफियांनी पोलिसांवरच हल्ला केला. एवढंच नाही तर त्यांनी आधी एका उप निरिक्षकाला आणि पोलिस कर्मचाऱ्याला डांबून ठेवलं होतं. त्यानंतर दोघांचेही अपहरण करण्यात आले. यामध्ये उप निरिक्षक जखमी अवस्थेत एका शेतात आढळला तर दुसऱ्या जागी पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला. 

कासगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिढपुरा इथं हा प्रकार घडला आहे. नगला धीमर गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारुचा व्यवसाय सुरु होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंर एक पथक मंगळवारी गावात छापा टाकण्यासाठी पोहोचलं होतं. याची कुणकुण लागलेल्या दारु माफियांनी पोलिसांनाच घेरलं आणि उपनिरिक्षकासह कर्मचारी देवेंद्र यांचे अपहरण केले. इतर पोलिसांना काही कळण्याआधीच माफियांच्या गुंडांनी पोलिस उप निरिक्षक अशोक आणि पोलिस कर्मचारी देवेंद्र यांना पळवून नेलं. शेवटी एका शेतात अशोक जखमी अवस्थेत आढळले तर दुसरीकडे पोलिस कर्मचारी देवेंद्र यांचा मृतदेह आढळला. 

हे वाचा - Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड

घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु केलं. दरम्यान, सिढपुरा आरोग्य केंद्राजवळ मृतदेह सापडला. माफियांनी पोलिस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या केली. या घटनेचं गांभीर्य समजताच पोलिसांनी घटनास्थळावर जादा कुमक मागवली आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर पोलिस उपनिरिक्षक अशोक यांची प्रकृती गंभीर आहे. 

हे वाचा - नवरीचा व्हायरल व्हिडिओ तर ट्रेलर होता; पिक्चर अभी बाकी है!

कासगंजमध्ये घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांवर NSA लागू करण्यास सांगितलं आहे.

या घटनेनं पुन्हा एकदा बिकरूची आठवण झाली. यामध्ये गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर जीवघेणा हल्ला झाला होता. यात काही पोलिस कर्मचाही हुतात्मा झाले होते. त्यानं आरोपीने उज्जैनमध्ये आत्मसमर्पण केलं होतं. मात्र कानपूरला येताना एन्काउंटरमध्ये विकास दुबे ठार झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police team attacked by goons during raid illegal liquor factory