डिस्चार्जमागे राजकीय षड्‌यंत्र: लालूप्रसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

"एम्स'मधील डॉक्‍टर "सीबीआय'सारख्या केंद्रीय संस्थांच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसत असून, लालूप्रसाद पूर्णपणे बरे झालेले नसतानाही त्यांना दिलेला डिस्चार्ज हा एकप्रकारे त्यांचा खून करण्याचा प्रयत्न आहे.
- जयप्रकाश यादव, "राजद'चे खासदार

नवी दिल्लीः "एम्स'मध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, त्यामागे राजकीय षड्‌यंत्र असल्याचा आरोप लालूप्रसाद यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेत प्रकृतीविषयी विचारपूस केली.

लालूप्रसाद यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, ती आता स्थिर आहे. प्रवास करण्यासाठी ते सक्षम असल्याने त्यांना परत रांची येथे पाठविण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या पथकाने घेतला असल्याची माहिती रुग्णालयाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. मात्र, लालूप्रसाद यांनी हा एक कट असल्याचा संशय व्यक्त केला असून, ""मी पूर्णपणे बरा होत नाही, तोपर्यंत माझ्यावरील उपचार सुरू ठेवावेत,'' अशी लेखी मागणी त्यांनी एम्सच्या संचालकांकडे केली आहे. आपल्या जीवितास काही झाल्यास त्याची जबाबदारी एम्सच्या व्यवस्थापनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, लालूप्रसाद यांच्या समर्थकांनी आज एम्स रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. त्यांनी रुग्णालयातील एका दरवाज्याची काच फोडून सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Political conspiracy behind Discharges: Lalu Prasad