गोव्याबाबत राजकीय निर्णय बुधवारी

Political decision regarding Goa will be on Wednesday
Political decision regarding Goa will be on Wednesday

पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेऊन या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. सध्या शहा राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. निरीक्षक आज (ता.17) सकाळी 11 वाजता गाभा समितीसोबत बैठक घेणार आहेत. याचवेळी काँग्रेसच्या विधीमंडळ गटाची बैठक होणार आहे.

गोव्यातील भाजप आघाडीच सरकारला स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी भाजपने घटक पक्ष आपल्यात विलीन व्हावेत यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपने उद्या पर्यायी नेतृत्वाचा विचार केल्यास सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी यासाठी हे प्रयत्न चालवले आहेत. गोवा फॉरवर्डचे तीन तर मगोचेही तीन आमदार आहेत. त्यांच्यावर भाजपचे लक्ष आहे. याचदरम्यान भाजप कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्यास गोवा फॉरवर्ड भाजपमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. गोवा फॉरवर्डला लोकसभेच्या निवडणूकीसह विधानसभेची निवडूक नको. मगोचे सुदिन ढवळीकर यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवल्यास मध्यावधी निवडणूक घेण्याचा मार्ग भाजपला मोकळा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाला गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर व विनोद पालयेकर या मंत्र्यांनी तसेच रोहन खंवटे, गोविंद गावडे, प्रसाद गावकर या अपक्ष आमदार- मंत्र्यांनी विरोध केला आहे. हे सहाही जण निरीक्षकांना भेटण्यासाठी एकत्रित गेले होते त्यातून त्यांनी भाजप नेतृत्वाला योग्य तो संदेश दिला आहे. त्याना भेटायला जाताना व भेटून परत येताना सरदेसाई यांनी कायम तोडग्यावर भर दिला होता. 

पर्रीकर यांच्यावरच विश्‍वास

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आमचा भक्कम पाठींबा आहे असे नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगून नेतृत्वबदल कराल तर सावधान असा इशारा दिला आहे. ढवळीकर यांच्या उपमुख्यमंत्रीपदाला आक्षेप घेत त्यांनी त्यांचे नेतृव चालणार नाही असे स्पष्ट केले आहे. सध्या विधानसभेत वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, नगरविकासमंत्री ऍड फ्रांसिस डिसोझा आणि पर्रीकर उपस्थित राहू शकत नसल्याने भाजपच्या आमदारांची संख्या प्रत्यक्षात 14 असली तरी संख्याबळ हे आजच्या घडीला 11 आहे याचाही विचार भाजपच्या नेत्यांना करावा लागत आहे. सरदेसाई यांनी आपल्यासह सहा जणांना भेटीला आणून राजकीय मुत्सद्दीगिरीचा परिचय देत भाजपला निर्णय घेणे सोपे ठेवलेले नाही. 

निरीक्षक गोव्यात चर्चा सुरु

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल, संघटन सहसचिव बी. एल. संतोष आणि प्रदेश संघटनसचिव विजय पुराणिक काल गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचे काय करायचे हा विषय सर्वांशी चर्चा करण्याचे काम त्यांच्याकडे पक्षाने सोपवले असले तरी चर्चेच्यावेळी तात्पुरता तोडगा नको असा विषय पुढे आला आहे. ढवळीकर यांना उपमुख्यमंत्री करून दोन महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपदाचा ताबा त्यांच्याकडे सोपविण्याचा एक विचार पुढे आला होता. त्याला भाजपच्या आमदारांचे समर्थन मिळाले असले तरी दुसऱ्या घटक पक्षाचे आणि अपक्षांचे समर्थन मिळू न शकल्याने आहे तीच व्यवस्था कशी पुढे रेटायची यावर चर्चा सुरु झाली आहे.

आमदारांशी स्वतंत्र चर्चा

भाजपच्या निरीक्षकांनी आमदारांशी स्वतंत्र चर्चा केली. दुपारी 2.15 वाजता ही चर्चा सुरु झाली. त्यांना भेटणाऱ्यांत प्रमोद सावंत, अलिना साल्ढाना, मिलींद नाईक, कार्लुस आल्मेदा, ग्लेन टिकलो, राजेश पाटणेकर, मायकल लोबो, विश्‍वजित राणे, नीलेश काब्राल यांचा समावेश होता. सायंकाळी सात वाजेपर्यंत आमदार प्रवीण झांटये, मंत्री माविन गुदिन्हो निरीक्षकांना भेटले नव्हते. सहा वाजता मित्रपक्षांसोबतची चर्चा सुरु झाली. सुरवातीला गोवा फॉरवर्ड व अपक्ष व नंतर मगोच्या आमदारांशी चर्चा झाली.

भाजपवर वाढता दबाव 

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे असलेली खाती कोणाकडे सोपवावीत यावरून सुरु झालेली राजकीय चर्चा आता "कायमस्वरुपी तोडगा काढा' यावर येऊन थांबली आहे. गोवा फॉरवर्डचे तीन आमदार व सरकारचे समर्थन करणारे तीन अपक्ष आमदार यांनी ही मागणी एकत्रितपणे केली आहे. त्यामुळे "निर्णय' घेण्यासाठी भाजपवर वाढता दबाव आहे. विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे 15 ऑगस्ट रोजीचे शासकीय ध्वजारोहण सोपवून मुख्यमंत्र्यांनी ते आपल्यानंतरचे नेते होऊ शकतात असे संकेत यापूर्वीच दिले आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्याशी त्यांनी चर्चाही केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार कायम तोडग्यांतर्गत होणार का हाही प्रश्‍न चर्चेत आहे. 

कॉंग्रेसची सत्ता स्थापनेची तयारी 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांचे वैयक्तीक मतभेद काल फोंडा येथे काल एका राजकीय नेत्याच्या बंगल्यावर झालेल्या एका बैठकीत मिटवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो किंवा कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या नावाचा विचार केल्यास गोवा फॉरवर्डला ते चालू शकेल अशी चर्चा झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

मी कोठे फाईल साचतात याकडे नेत्यांचे लक्ष वेधले आहे. त्यात सुधारणा झाल्यास सरकारचा कारभार सुधारेल. 

- कार्लुस आल्मेदा, आमदार 

सरकार स्थीर आहे. ते अस्थीर होऊ नये यासाठी घटक पक्षापैकी एकाचे विलीनीकरण करा, अशी सुचना केली आहे. 

- मायकल लोबो, उपसभापती 

राजकीय परिस्थिीचे नेते विश्‍लेषण करतील. ते योग्य तोच निर्णय घेतील. 

- विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री 


मुख्यमंत्री बदलाचा प्रश्‍न नाही. प्रशासन गतिमान करण्यासाठी काही बदल करणे गरजेचे आहे, त्यावर चर्चा आहे. 

- खासदार विनय तेंडुलकर, प्रदेशाध्यक्ष 

आम्हाला तात्पुरता तोडगा नको. कायम तोडगा हवा. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आमचा पाठींबा कायम आहे. 

- विजय सरदेसाई, नगरनियोजनमंत्री

लोकसभेच्या निवडणुकीविषयीही चर्चा झाली. घटक पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सदस्य असल्याने त्यांच्याशी चर्चा झाली. 

- अॅड. नरेंद्र सावईकर, खासदार

मुख्यमंत्रीपदी पर्रीकर हेच कायम हवेत. मंत्रिमंडळातील दोन जागा भराव्यात याकडे लक्ष वेधले.

- नीलेश काब्राल, आमदार

राजकीय परिस्थितीची कल्पना निरीक्षकांना दिली आहे. आता दिल्लीतच योग्य तो निर्णय होईल. 

- श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री  
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com