संघाचा स्वयंसेवकच पुन्हा राज्याचा सूत्रधार 

संघाचा स्वयंसेवकच पुन्हा राज्याचा सूत्रधार 

चंडीगड - हरियानाच्या मुख्यमंत्रिपदी सलग दुसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या मनोहरलाल खट्टर यांचा आतापर्यंतच राजकीय प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक साधा स्वयंसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री ही त्यांची वाटचाल खडतर होती. वयाच्या चोविसाव्या वर्षी ते संघाच्या शाखेवर गेले आणि त्यानंतरची वीस वर्षे त्यांनी भाजपचा एका सामान्य कार्यकर्ता म्हणून केले. मूळचे पंजाबी असणाऱ्या खट्टर यांनी जाटबहुल हरियानाचे नेतृत्व करणे, ही तशी सोपी गोष्ट नव्हती; पण पक्षश्रेष्ठींच्या विश्‍वासामुळे त्यांना संधी मिळाली.

देशाची 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर खट्टर यांचे वडील आपल्या कुटुंब कबिल्यासोबत रोहतक जिल्ह्यातील निदाना गावामध्ये येऊन स्थायिक झाले होते. तेथेच 1954 मध्ये मनोहरलाल यांचा जन्म झाला. पुढे त्यांच्या वडिलांनी बनियानी गावामध्ये जमीन घेतली आणि ते तेथेच स्थायिक झाले. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मनोहरलाल यांनी दिल्लीतील सदर बाजार परिसरामध्ये दुकानदारी सुरू केली होती. व्यवसाय करतानाच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षणही घेतले. संघ कार्याला शिरोधार्य मानून त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ला संघ प्रचारासाठी पूर्णवेळ वाहून घेतले.

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खट्टर यांनी कधीकाळी संघाचे प्रचारक म्हणून एकत्र काम केले आहे. मोदी आणि खट्टर हे एकाच खोलीमध्ये राहत असत. पुढे मोदींच्या आग्रहास्तव त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. याआधी स्वबळाची ताकद हाती असल्याने खट्टर यांना राज्यशकट सांभाळणे सोपे होते; पण आता मात्र सत्तेतील दुसऱ्या वाटेकऱ्याला समजून घेताना त्यांचा खरा कस लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com