राजकीय पक्षांचा निवडणूक खर्च होणार 'लिमिटेड'?

पीटीआय
गुरुवार, 4 जुलै 2019

उमेदवारांप्रमाणेच राजकीय पक्षांनाही निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सरकारकडून सध्या अभ्यास करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिली. 

नवी दिल्ली : उमेदवारांप्रमाणेच राजकीय पक्षांनाही निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सरकारकडून सध्या अभ्यास करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिली. 

प्रसाद यांनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे, की उमेदवारांप्रमाणेच राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. निवडणुकीतील खर्चाबाबत 2015 मध्ये झालेली चर्चा आणि कायदा आयोगाच्या निवडणूक सुधारणांबाबतच्या अहवालाच्या आधारे निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव तयार केला आहे.

उमेदवारांप्रमाणेत राजकीय पक्षांनाही निवडणुकीतील खर्चासाठी मर्यादा आखून देण्याची आवश्‍यकता आसल्याचे त्यात नमूद केले आहे. तसेच, या प्रस्तावाला संबंधित सर्व घटकांचा पाठिंबा आहे, असेही आयोगाने नमूद केले आहे. 

वेगवेगळ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चावर निर्बंध लादण्यात आले आहेत. ठरवून दिलेल्या मर्यादेतच खर्च करण्याचे बंधन उमेदवारांना घालण्यात आले आहे. अशाच प्रकारे राजकीय पक्षांनाही नियम लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Parties Election Expenditure may Limited