"यादवां'चे भविष्य मतपेटीत बंदिस्त;61% मतदान

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षाची या टप्प्यावरच मुख्य भिस्त असल्याचे मानले जात आहे. कानपूर, लखनौ या राज्यातील मुख्य शहरांसहित कनौज, इटावाह, मैनपुरी आणि फारुखाबाद या भागामध्ये या टप्प्यामध्ये मतदान झाले आहे

लखनौ - उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान आज (रविवार) बहुतांशी शांततेत पार पडल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी टी व्यंकटेश यांनी दिली. या टप्प्यामध्ये 61 टक्‍क्‍यांहूनही अधिक मतदान झाले.

या टप्प्यात मतदान केल्या गेलेल्या सर्व 25,603 मतदान केंद्रांसाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. मतदानाचे हे प्रमाण 2012 मधील राज्य निवडणूक (59.96%) व 2016 मधील केंद्रीय निवडणुकीमधील (58.43%) मतदानाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. या टप्प्यात राज्यातील 69 मतदारसंघांसाठी मतदान केले जात आहे. या टप्यात तब्बल 826 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंदिस्त झाले आहे.

राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षाची या टप्प्यावरच मुख्य भिस्त असल्याचे मानले जात आहे. या भागात समाजवादी पक्षाचेच वर्चस्व याआधी दिसून आले असून गेल्या निवडणुकीत येथील 69 जागांपैकी तब्बल 55 जागा जिंकण्यात पक्षास यश आले होते. कानपूर, लखनौ या राज्यातील मुख्य शहरांसहित कनौज, इटावाह, मैनपुरी आणि फारुखाबाद या भागामध्ये या टप्प्यामध्ये मतदान झाले आहे. यामुळेच, या टप्प्यावर उत्तर प्रदेशमधील सर्वांत प्रभावशाली राजकीय कुटूंब असलेल्या यादवांची प्रतिष्ठाही अवलंबून असल्याचे मानले जात आहे.

Web Title: UP polls: 61% turnout in phase 3