दिल्लीमधील वायु प्रदुषण वाढता वाढे...

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही दिवाळीच्या रात्रीस वायुप्रदुषणाचे प्रमाण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून निश्‍चित करण्यात आलेल्या निकषांपेक्षा तब्बल 14 ते 16 पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. हवेच्या गुणतवत्तेची तपासणी करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार दिवाळीच्या रात्री दिल्लीमधील वायु प्रदुषणाची पातळी "अत्यंत गंभीर' होती

नवी दिल्ली - दीपावली हा खरे तर आनंदाचा क्षण.. उत्तम आरोग्यामुळे कोणत्याही सणाचा आनंद द्विगुणित होतो. मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी फोडण्यात येणाऱ्या फटाक्‍यांमुळे होणाऱ्या वायु प्रदुषणाच्या पातळीने सुरक्षेचे सर्व मापदंड ओलांडल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येही दिवाळीच्या रात्रीस वायुप्रदुषणाचे प्रमाण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून निश्‍चित करण्यात आलेल्या निकषांपेक्षा तब्बल 14 ते 16 पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. हवेच्या गुणतवत्तेची तपासणी करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार दिवाळीच्या रात्री दिल्लीमधील वायु प्रदुषणाची पातळी "अत्यंत गंभीर' होती.

दिल्ली प्रदुषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार, राजधानीमधील आनंद विहार भागामध्ये 2.5 मायक्रोमीटर अथवा त्यापेक्षा कमी व्यास असलेल्या कणांचे (पर्टिक्‍युलेट मॅटर) प्रमाण एका क्‍युबिक मीटरमागे 883 (मायक्रोग्राम्स) इतके दिसून आले. सुरक्षा मापदंडांनुसार प्रत्येक क्‍युबिक मीटरमागे या कणांचे प्रमाण 60 इतके निश्‍चित करण्यात आले आहे. याचबरोबर, आनंद विहार भागामध्येच पीएम 10 (10 मायक्रोमीटर वा त्यापेक्षा कमी व्यास असलेले कण) कणांचे प्रमाण प्रत्येक क्‍युबिक मीटरमागे तब्बल 1680 (मायक्रोग्राम्स) इतके दिसून आले. मापदंडांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण तब्बल 16 पटींपेक्षाही जास्त आहे.

याचबरोबर, पश्‍चिम दिल्लीमधील पंजाबी बाग भागामध्ये पीएम 2.5 व पीएम 10 कणांचे प्रमाण सुरक्षा निकषांच्या तुलनेमध्ये 10 व 15 पटींनी जास्त असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, राजधानीमधील अन्य भागांमध्येही प्रचंड प्रदुषण झाल्याचे निष्पन्न झाले. दिल्ली व देशातील अन्य भागांमधील वायु प्रदुषणाच्या या प्रचंड प्रमाणाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरांवर अनेक वेळा चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: pollution knows no limit in delhi