फिफा परिषदेच्या सदस्यपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

- प्रफुल्ल पटेल यांची फिफा परिषदेच्या सदस्यपदी निवड

क्वालालंपूर : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली. या परिषदेवर निवडले जाणारे पटेल हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. पटेल यांच्या बाजूने 46 पैकी 38 मते पडली.

क्वालालंपूर येथे आज आशियाई फुटबॉल परिषदेची 29वी सभा घेण्यात आली. या वेळी सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांचा कार्यकाळ 2019 ते 2023 पर्यंत चार वर्षांचा असणार आहे. फिफासाठी निवड झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आशियाई महासंघाच्या सदस्यांचे आभार मानले आहेत. आपण केवळ देशाचेच नाही, तर उपखंडाचे प्रतिनिधित्व करू. आशिया खंडात फुटबॉलच्या विकासासाठी माझ्यावर विश्‍वास व्यक्त केल्याबद्दल आभारी आहे, अशा शब्दांत पटेल यांनी ऋण व्यक्त केले. या वेळी पटेल यांच्यासमवेत भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास, वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रत दत्ता उपस्थित होते.

पटेल यांची निवड ही भारतीय फुटबॉलचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया दत्ता यांनी या वेळी दिली. फिफावर त्यांची निवड झाल्याने आशियाई फुटबॉलला फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या परिषदेसाठी पटेल यांच्याव्यतिरिक्त मोहन्नदी (कतार), खालिद अवाद अल्बेबिती (सौदी अरब), मारियानो व्ही. अर्नेटा ज्युनिअर (फिलिपिन्स), चुंग मोंग ग्यु (कोरिया रिपब्लिक), दू झोकाई (चीन), मेहदी ताज (इराण) आणि कोहजो तशिमा (जपान) यांचा समावेश आहे. 

Web Title: Praful Patel elected as FIFA Council member first from India