साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुरामला ठरवले देशभक्त

वृत्तसंस्था
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- साध्वी प्रज्ञासिंह यांनी संसदेत केले वादग्रस्त वक्तव्य.

नवी दिल्ली : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी संसदेत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत वाद ओढावून घेतला. नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे विधान त्यांनी केले. त्यांच्या विधानावर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

लोकसभेत "एसपीजी दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी गोडसेने महात्मा गांधीची हत्या का केली? असा प्रश्‍न विचारत उदाहरण दिले. या वेळी ते म्हणाले की, गोडसेच्या मनात गांधीजींबाबतचा द्वेष होता. तसेच महात्मा गांधी हे वेगळ्या विचारधारेचे असल्यामुळेच त्यांनी गांधीजींची हत्या केली. अशी कबुलीही गोडसेने दिली होती, असे राजा म्हणाले.

चर्चेदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राजा यांना मध्येच थांबवत तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण लोकसभेत देऊ शकत नाही, असे म्हणाल्या. त्यांच्या विधानानंतर संसदेत एकच गोंधळ उडाला. या वेळी कॉंग्रेसच्या सदस्यांनी कडाडून विरोध करत प्रज्ञांवर कारवाईची मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya Thakurs comment during SPG debate