
देशात गेल्या काही दिवसांपासून नामिबियावरुन आणलेल्या चित्त्यांची चर्चा सुरू आहे. त्यावरुन कोणी पंतप्रधानांवर टीका करतंय तर कोणी त्यांचं कौतुक. तर एकीकडे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा काढली जात आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजपा असा जणू सामनाच सुरू असल्याचं चित्र आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. पंतप्रधान मोदींवर त्यांनी कठोर टीका केली आहे.
यावेळी सरकारी मालमत्ता आणि मोदी सरकारच्या खर्चाविषयी रिझर्व बँकेने सादर केलेल्या अहवालाचा उल्लेख करत आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, "रिझर्व बँकेच्या गव्हर्नरने दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला अहवाल सामान्य माणसासाठी महत्त्वाचा आहे. त्यात म्हटलंय की तुम्ही अंदाधुंध पद्धतीने सरकारी मालमत्ता विकत आहे. हे देशहिताचं नाही. माझ्या भाषेत सांगायचं झाल्यास दारुड्याला दारू प्यायला पैसे मिळाले नाही की तो घरातली भांडी विकतो. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे. मी दोन वर्षांपूर्वी हे बोललो होतो, आता रिझर्व बँकेनं त्याला पुष्टी दिली आहे."
आंबेडकर पुढे म्हणाले की, देशाची वाटचाल सध्या हुकुमशाहीकडे सुरू आहे. नेहरूंनी शांततेसाठी कबुतरं सोडली होती. पण मोदींच्या त्यांच्या वाढदिवसादिवशी कबुतरं नाही सोडली तर चित्ता आणला आणि सगळ्यांना चित्ता सोडण्याची भीती दाखवली. आत्तापर्यंत ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स होता, आता चित्ता आहे. या दोन वेगळ्या प्रवृत्ती आहेत.