समाजवाद्यांचा काँग्रेसविरोध दिशाहीन

प्रकाश पाटील
बुधवार, 25 जानेवारी 2017

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशातील मतदारांचे वय 21 वरून 18 केल्याने काँग्रेस आणि भाजपकडे तरुण-तरुणींचा ओढा अधिक दिसून येतो. कोणी काही म्हणो मोदीप्रमाणेच देशातील तरुणांना राहुल आणि प्रियांका गांधी भावतात. ते विरोधात असले तरी तरुणाईला हा पक्ष आवडतो. समाजवादी पक्ष काळाबरोबरच जायलाच तयार नाहीत. 

समाजवादी मंडळी काँग्रेसला विरोध करून काहीच साध्य करू शकत नाही. काँग्रेस हा सर्व धर्म-जातींना बरोबर घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. भाजपशी लढायचं तर सर्व धर्मनिरपेक्ष गटांनी एकत्र व्हायचे की काँग्रेसला विरोध करायचा हे ठरवायला हवे. काँग्रेस, भाजपला विरोध करून समाजवाद्यांचा कोणताही पक्ष स्वबळावर देशात सत्तेवर येण्याचे दिवस आता संपले आहेत हे त्यांना कोण सांगणार. 

देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून डावे-समाजवादी, शिवसेना-मनसे त्यानंतर काँग्रेसवाले खूपच अस्वस्थ आहेत. मोदी लाटेत पालापाचोळा झाल्याने तर काही मंडळींची स्वप्नेच धुळीला मिळाल्याने घुसमट झाली. ही घुसमट सारखी सारखी उफाळून येते. काय करावे आणि काय बोलावे हे या मंडळींना सुचतच नाही. त्यामुळे कधी चिडचिड तर कधी संताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. पण, सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याने टीका करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही, असो. डावे, शिवसेना-मनसे आणि काँग्रेस यांना बाजूला सारून बिचाऱ्या गरीब, त्यागी, वंचितांचे कैवारी, धर्मनिरपेक्षवादी समाजवाद्यांवर थोडं भाष्य करायला हवं असं मला वाटलं. 

आताच्या असहिष्णू, मनगटशाही, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. ही गरज विचारवेध संमेलनाच्या माध्यमातून दूर होऊ शकते असा विश्वास समाजवादी विचारवंतांना वाटतो. पुण्यातील या संमेलनाला उपस्थित राहिल्यानंतर समाजवादी मंडळींनी जे विचार व्यक्त केले ते ऐकून हसावे की रडावे हाच विचार आला. सर्वच विचारवंत जातीनिर्मुलनावर, धर्मनिरपेक्षतेवर आणि राष्ट्रवादावरही खूप भरभरून बोलले. केंद्रातील मोदी सरकारला कडाडून विरोध करताना दुसरीकडे काँग्रेसलाही विरोध केला. म्हणजेच भाजप आणि काँग्रेसला एकाचवेळी शिंगावर घेतात. एकेकाळी त्यांनी काँग्रेसलाही विरोध केला. भाजपच्याही मांडीला मांडी लावून बसले. इतकेच नव्हे तर सत्तेतही सहभागी झाले. हा सर्व पूर्वइतिहास आहे. 

'राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो' आणि मित्रही नसतो' हे उगाळून उगाळून वापरलेले वाक्‍य नाइलाज म्हणून पुन्हा वापरतो. समाजवादी मंडळी खूप मोठं तत्त्वज्ञान सांगतात. मात्र प्रत्यक्षात ते प्रत्येकवेळी तडजोडी करतात. हा शुद्ध भंपकपणा आहे. आज देशात भाजप जो वाढला आणि फुलला त्याला केवळ हे समाजवादी मंडळीच जबाबदार आहेत. केंद्रातील जनता पक्ष, जनता दलाचा इतिहास कोणीही तपासू शकतो. या पक्षात सर्वच नेते अतिहुशार असल्याने त्यांचे एकमत कधीच बनले नाही. त्यामुळे फुटीचा शाप समाजवादी पक्षांना आहे. समाजवाद्यांपेक्षा मग ते डावे बरे. निदान ते आपल्या तत्त्वाशी नेहमीच बांधील राहिले. ते आजपर्यंत कधीही भाजपच्या वाटेला गेले नाहीत. त्यांनी ठरविले असते तर त्यांच्या पक्षाचे दिवंगत नेते ज्योती बसू पंतप्रधानही बनले असते.

देशाच्या राजकारणाचा विचार केल्यास आणि सर्व समाजवादी पक्षांकडे पाहिल्यास आजही त्यांची काही राज्यात ताकद दिसून येते. मग ते उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष असो किंवा बिहारमधील राजद, जेडीयू, ओरिसातील बीजेडी असो. पण, मोदींसारखा एक खमक्‍या नेता या पक्षाला नाही. जरी नेता मिळाला तरी त्याला खूप काळ हे हुशार लोक टिकूनही देत नाही. सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसचा टेकू घ्यायचा आणि भाजपला शिव्या द्यायच्या. भाजपचा टेकू घेतला की काँग्रेसला लक्ष्य करायचे. नेमकी दिशाच नाही त्यांच्या नौकेला. दोघांची साथ सुटली की ते यांच्या रडारवर. कुठे जायचे आणि कुठे थांबायचे हेच कळत नाही. 

तरुणाई कुठे आहे? 
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशातील मतदारांचे वय 21 वरून 18 केल्याने काँग्रेस आणि भाजपकडे तरुण-तरुणींचा ओढा अधिक दिसून येतो. कोणी काही म्हणो मोदीप्रमाणेच देशातील तरुणांना राहुल आणि प्रियांका गांधी भावतात. ते विरोधात असले तरी तरुणाईला हा पक्ष आवडतो. समाजवादी पक्ष काळाबरोबरच जायलाच तयार नाहीत. 

मुलायमसिंह यादवांचे चिरंजीव अखिलेश त्याला अपवाद असू शकतील पण चित्र मात्र आशादायक नाही. आपला देश, आपले राष्ट्र, आपला धर्म, आपली माणसं आणि आपली संस्कृती याविषयी ही मंडळी उगाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गप्पा मारतात. आता मार्क्‍स, लेनीनचे तत्त्वज्ञान ऐकायला आणि प्रत्यक्षात ते कृतीत आणायला येथे कोण मोकळे आहे. भाकरी आणि चंद्राचे डोस हे उठताबसता पाजत बसतील तर तरुणाई कशी आकर्षित होणार याचा विचार होताना दिसत नाही. परवाच्या विचारवेध संमेलनात या मंडळींची भाषणे ऐकली. मला एक क्षणभर वाटले हीच भाषणे पंचवीस-तीस वर्षापूर्वी ऐकली होती का? नवे काही नाहीच हो! महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष तर कोठेच दिसत नाही. कधी तरी सभा संमेलनात दिसतात. तेही हातात काठी घेतलेले नेते. तरुण, तडफदार नेत्यांना तयार केले. भाजप, शिवसेना, काँग्रेसविरोधात लढण्यासाठी मोठी फौज आहे असेही कुठे दिसत नाही. दोनशे-पाचशे लोक जमले की यांना बोलण्याचे भानही राहात नाही. इतकं जड शब्दात तत्त्वज्ञान सांगतात ते कळायचं म्हणजे अवघडच. संमेलन होत पण त्यात विचार नव्हता. जोश नव्हता. 

महात्मा गांधीजी बलाढ्य ब्रिटिशांविरोधात लढले. एका निःशस्त्र माणसाने ब्रिटिश साम्राज्याला हलवून सोडले. स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत उडी घेतल्यानंतर त्यांनी धर्म सोडला नाही. उलट सार्वजनिक जीवनात हिदूं बरोबरच सर्व धर्मातील लोकांना बरोबर घेऊन ब्रिटिशांविरोधात रणशिंग फुंकले. समाजवाद्यांनी नेमके उलटे केले. त्यांनी धर्मालाच नाकारले आणि लोकांनी यांना नाकारले. आजही धर्म हा प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. हे कोणीच नाकारू शकणार नाही. प्रत्येकालाच आपला धर्म प्रिय असतो. जसा गांधीजींना धर्म जवळच वाटत होता. तसेच बिल क्‍लिंटन अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी शपथ घ्यायला निघाले तेव्हा त्यांच्याही हातात बायबल होते. समाजवादी मंडळी जे काही सांगतात ते सर्व खोटे आहे असे नाही. काही विचार खूपच चांगले आणि स्वागतार्ह आहेत. जातीअंताचा मुद्दा तर खूप चांगला आहे. तरीही तरुणाईला आकर्षित करणारे व्हिजन असावे असे वाटते. 

शेवटी राहतो प्रश्‍न तो काँग्रेसचा. समाजवादी मंडळी काँग्रेसला विरोध करून काहीच साध्य करू शकत नाही. काँग्रेस हा सर्व धर्मजातींना बरोबर घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. भाजपशी लढायचं असेल सर्व धर्मनिरपेक्ष गटांनी एकत्र व्हायचे की काँग्रेसला विरोध करायचा हे ठरवायला हवे. काँग्रेस, भाजपला विरोध करून समाजवाद्यांचा कोणताही पक्ष स्वबळावर देशात सत्तेवर येण्याचे दिवस आता संपले आहेत हे त्यांना कोण सांगणार. उत्तरप्रदेशात अखिलेश आणि काँग्रेसने एकत्र येण्याचा जो शहाणपणा दाखविला आहे त्याचे स्वागत केले पाहिजे. अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घशाला कोरड पडेपर्यंत कितीही जोरात बोंब ठोकली तरी त्याचा फायदा होईल असे वाटत नाही.

Web Title: Prakash Patil write about samajwadi parties