प्रणव मुखर्जींचे निधन; देशात 7 दिवसांचा दुखवटा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

मुखर्जींनी लष्करी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जातील. 

नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. मुखर्जींचे सुपुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटरवरून निधनाची माहिती दिली. माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने याची घोषणा केली. मुखर्जींनी लष्करी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जातील. 

प्रणव मुखर्जी बऱ्याच काळापासून आजारी होते. 10 ऑगस्टला उपाचारानिमित्त त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी मेंदूतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर प्रणव मुखर्जींच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. तसंच ते व्हेंटिलेटरवर होते आणि कोमातही गेले होते. 

भारताच्या राजकारणातील खरेखुरे स्टेट्समन आणि आपल्या ५१ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात देशाच्या अनेक सरकारांचे संकटमोचक, अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. 

हे वाचा - मुरब्बी आणि मुत्सद्दी प्रणवदा; मनमोहनसिंग मंत्रीमंडळाचे संकटमोचक

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या श्रद्धांजली संदेशामध्ये निधन याची बातमी वेदनादायी असल्याचे म्हटले आहे त्याच्या महान नेत्यांपैकी एक असलेले मुखर्जी यांचे समर्पण आणि कार्यक्षमता यामुळे ते कायम देशाच्या स्मरणात राहतील, असेही काँग्रेसने आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देहावसान म्हणजे एका युगाची समाप्ती आहे. सार्वजनिक जीवनात अतिशय उंचीवर पोचलेल्या प्रणवदांनी एखाद्या संताप्रमाणे भारत मातेची अहर्निश सेवा केली. 
-राष्ट्रपती रामनाथ कोविंद 

हे वाचा - बंडखोर प्रणवदा : काँग्रेसला राम राम करून काढला होता पक्ष

प्रणवदांच्या निधनाने देशाने दूरदृष्टी असलेला एक वरिष्ठ नेता गमावला आहे. अखंड कार्यमग्नता, शिस्त व समर्पण यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. 
-उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू 

प्रणवदांच्या निधनामुळे देशाच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा दीर्घ अनुभव त्यातली शिस्त यांचा लाभ देशातील अनेकच सरकारांना वेळोवेळी होत आला आहे. 
-संरक्षणमंत्री राजनाथसिंह 

हे वाचा - दिल्लीत नवा होतो तेव्हापासून मुखर्जींनी मार्गदर्शन केलं; मोदींनी उलगडला स्नेहबंध

त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठे शून्य निर्माण झाले समर्पण भावाने देशसेवा करणारे आणि देशासाठी अभिमान वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. 
-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pranab mukharjee demise Centre declares 7 day national mourning