esakal | प्रणव मुखर्जींबद्दल मुलीची भावनिक पोस्ट; जे होईल ते स्वीकारण्याची शक्ती ईश्वर देईल
sakal

बोलून बातमी शोधा

mukharjee

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीरच असल्याची माहिती आर्मी रिसर्च ॲंड रेफरल हॉस्पिटलने दिली.

प्रणव मुखर्जींबद्दल मुलीची भावनिक पोस्ट; जे होईल ते स्वीकारण्याची शक्ती ईश्वर देईल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीरच असल्याची माहिती आर्मी रिसर्च ॲंड रेफरल हॉस्पिटलने दिली. मुखर्जी यांना कोरोना संसर्गामुळे १० ऑगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, मेंदूतील गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मुखर्जी यांनी स्वत: सोमवारी (ता.१०) ट्विटरवरून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. 

दरम्यान, मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हिने ट्विटरवर पित्याबद्दल भावनिक पोस्ट लिहिली. ईश्वर त्यांच्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडेल आणि जे काही पुढे होईल, त्याचा स्वीकार करण्याची शक्ती देईल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी माझ्या वडिलांना भारत रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तो माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा दिवस होता. त्याच्या बरोबर एक वर्षानंतर १० ऑगस्टला त्यांची प्रकृती गंभीर झाली. ईश्वर मला सुखदु:ख समानतेने स्वीकारण्याची शक्ती देईल. मी सर्वांचे आभार मानते, असेही त्यांनी ट्टिवरवर म्हटले आहे. 

काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, अर्थ अशा वेगवेगळ्या खात्यांची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. 2004मध्ये सत्तेत आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) काळात प्रणव मुखर्जी यांनी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. सरकारचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जात होता.

काँग्रेसने 2012मध्ये त्यांना राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार घोषित केले. प्रतिस्पर्धी उमेदवार पी. ए. संगमा यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर, 25 जुलै 2012 रोजी मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे मुखर्जी हे पहिले बंगाली व्यक्ती आहेत. 

loading image