esakal | पवारभेट मग गांधीमिलन; प्रशांत किशोर इतकी धडपड का करताहेत?
sakal

बोलून बातमी शोधा

पवारभेट मग गांधीमिलन; प्रशांत किशोर इतकी धडपड का करताहेत?

पवारभेट मग गांधीमिलन; प्रशांत किशोर इतकी धडपड का करताहेत?

sakal_logo
By
विनायक होगाडे

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतलीय. राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहता ही घडामोड निश्चितच मोठी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी त्यांच्या झालेल्या भेटीगाठी, त्यानंतर सुरु झालेल्या काँग्रेसविरहीत तिसऱ्या आघाडीच्या चर्चा आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी घेतलेली राहुल गांधींची भेट अनेक प्रश्न उपस्थित करते. अर्थात 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मरगळ आलेल्या विरोधी पक्षांमध्ये प्रशांत किशोर एखाद्या उत्प्रेरकासारखे काम करत आहेत का? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची घट्ट अशी मोट यूपीएचा उमेदवार विजयी करुन बांधून केंद्रातील मोदी सरकारला शह देण्यासाठी या उठाठेवी सुरु आहेत का? या आणि अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आपण या साऱ्या घडामोडींचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न करुयात...

हेही वाचा: Maharashtra Unlock : राज्यातील निर्बंध शिथिल होणार?

सर्वांत आधी म्हणजे काल राहुल गांधी यांच्या घरी झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित होत्या. तसेच के सी वेणुगोपाल आणि हरिष रावत असे दोन काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी देखील उपस्थित असल्याचं काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे मध्यंतरी सुरु असलेल्या काँग्रेसविरहीत तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना काही अर्थ नव्हता. अर्थात हीच बाब शरद पवार यांच्या घरी बैठकीत असलेल्या अनेकांनी नंतर स्पष्टही केली होती. मात्र, किशोर यांच्या या राहुलभेटीमुळे ती पुन्हा ठळकपणे अधोरेखित झालीय, असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेस पक्ष मागून चर्चा करण्याऐवजी अधिकृतरित्या प्रशांत किशोर यांची मदत घेऊ इच्छित आहे, हेही स्पष्ट होतंय.

हेही वाचा: गर्दी वाढल्यास निर्बंध कठोर करा, केंद्राचे राज्यांना नवे आदेश

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला सावळा गोंधळ सुरु आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह प्रशांत किशोर यांचा सल्ला घेतात, त्यामुळे हा गोंधळ निस्तरण्यासाठीची ही बैठक होती, असंही म्हटलं जात असलं तरीही याला काँग्रेसच्या सुत्रांनी दुजोरा दिला नाहीये. प्रशांत किशोर हे मोठे राजकीय रणनीतीकार असून जेंव्हा ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटतात, तेंव्हा राज्यपातळीवरील चर्चांसाठी ही भेट निश्चितच नसणार आणि ही बैठक त्याहून अधिक वेगळ्या कारणांसाठी होती, हे निश्चित आहे, असंही सुत्रांनी म्हटलंय. 2024 च्या निवडणुकांसाठी भाजपविरोधातील मोर्चा अधिक तीव्र करण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचं काम प्रशांत किशोर करतायत, अशीही चर्चा आहे. हिंदुस्थान टाईम्समधील एका रिपोर्ट्सनुसार, सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास 2022 मध्ये भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, असं किशोरनी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाला सुचवल्याचं म्हटलंय.

विरोधकांच्या या साऱ्या राजकीय खेळीमागचा सुत्रधार प्रशांत किशोर बनत असून ते भविष्यात काँग्रेसमध्ये प्रवेश देखील करु शकण्याच्या अफवा सध्या राजकीय वातावरणात जोरात वाहत आहेत. मात्र, हा सगळा झाला शंका-कुशंकांचा सूर....

हेही वाचा: देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे 'लय भारी'

पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी शरद पवार यांची निवड व्हावी यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी ही बैठक असल्याचंही बोललं जातंय. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रशांत किशोर शरद पवार यांच्याशी तब्बल तीनवेळा भेटले होते. ओडीसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी एनडीएविरोधातील विरोधकांना पाठिंबा देऊ केला तर शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाचा मार्ग सुकर होईल, असं प्रशांत किशोर यांचं गणित असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये बिगरभाजपशासित महाराष्ट्र आणि तमिळनाडू ही राज्ये देखील सोबतीला असतील. मात्र, नवीन पटनायक यांची भुमिका अद्याप अस्पष्ट आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर नुकतेच नवीन पटनायक आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्याशी भेटले आहेत. ममता बॅनर्जी, जगन रेड्डी, अरविंद केजरीवाल, स्टालिन आणि उद्धव ठाकरे यांच्याशी सौख्याचे संबंध असणाऱ्या किशोर यांचं हे राजकीय गणित जर का अचूकरित्या साकारलं गेलं तर त्याचा फायदा 2024 च्या लोकसभेमध्ये विरोधकांना होऊ शकतो. बंगाल आणि तामिळनाडूमधील विजयानंतर किशोर आता निवडणूक रणनीती करण्याचं काम सोडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सध्याच्या त्यांच्या एकूण हालचालींवरुन असं दिसतंय की ते येत्या काही महिन्यांत विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांशी संवाद साधत राहतील आणि राष्ट्रीय पर्यायाला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात एक महत्त्वाची व्यक्ती ठरतील.

loading image